सोयाबीन-कापूस प्रश्नी शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी नागपूरात घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, कृषी मंत्री अब्दूल सत्तारांची भेट! सोयाबीन - कापूस पुन्हा पेटण्याची चिन्हे

 
jyhf
नागपूर (लाइव्ह ग्रुप नेटवर्क): सोयाबीन-कापसाच्या दरवाढी साठी महाराष्ट्रभर आंदोलन करणारे फायरब्रॅंड शेतकरी नेते रविकांत तुपकर पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत.  तुपकरांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,कृषी मंत्री अब्दुल सत्तार व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची नागपूर विधानभवनात भेट घेवून सोयाबीन-कापसाच्या प्रश्नावर लक्ष वेधले...!

सोयाबीनचे दर प्रति क्वि. ५५०० च्या वर जायला तयार नाहीत व कापसाचे दरही दीड हजारांनी घटले आहेत. त्यामुळे तुपकर पुन्हा एकदा आक्रमक होण्याच्या तयारीत आहेत. तुपकरांनी ६ नोव्हेंबर ला बुलडाण्यात सोयाबीन-कापूस उत्पादकांचा विराट मोर्चा काढला होता. अरबी समुद्रात जलसमाधी घेण्यासाठी तुपकरांच्या नेतृत्वात हजारो शेतकरी मुंबईत धडकले, त्यावेळी राज्य सरकारने तुपकरांशी सह्याद्री अतिथी गृह येथे चर्चा केली व राज्य सरकार, केंद्र सरकारशी चर्चा करून मार्ग काढेल असा शब्दही दिला होता. परंतु राज्य सरकारने केंद्र सरकारशी चर्चा न केल्याने तुपकर संतप्त झाले आहेत. तुपकरांची केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल व कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांच्याशी चर्चा झाली होती. पण यासंदर्भात अजून कोणताही ठोस निर्णय झाला नाही. त्यामुळे तुपकरांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांची दि.२९ डिसें. रोजी भेट घेवून केंद्राकडे सोयाबीन-कापसाच्या दरवाढीसाठी आयात निर्यात धोरणात बदल करण्यासाठी पाठपुरावा करण्याची मागणी केली आहे. अन्यथा पुन्हा एकदा आक्रमक आंदोलनाचे हत्यार उपसावे लागेल, असा इशारा दिला आहे.

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या भेटीत जंगली जनावरांपासून शेतीला संरक्षण मिळावे यासाठी शेतीला कंपाउंड करण्याची योजना तात्काळ आणावी,अशी मागणी तुपकरांनी रेटून धरली. यासंदर्भात शेतीला कंपाउंड करण्याची योजना लवकरात-लवकर आणण्याचा, शब्द मुनगंटीवारांनी दिला...