खासदार प्रतापराव जाधवांच्या दाव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ! म्हणाले,आणखी ३ खासदार, ८ आमदार बाळासाहेबांच्या शिवसेनेत येणार

 
jadhav
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  बुलडाणा लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून केंद्रीय मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार असलेले प्रतापराव जाधव यांच्या एका विधानाने सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. ठाकरे गटाचे ३ खासदार आणि ८ आमदार बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा प्रतापराव जाधवांनी केला आहे.

अजूनही ठाकरे गटातील खासदार आणि आमदार आमच्या संपर्कात आहेत. पण त्यांच्या स्थानिक पातळीवरच्या व काही व्यक्तिगत अडचणी आहेत. नेतृत्वावर विश्वास किंवा प्रेम आहे म्हणून ते तिथे थांबलेले नाहीत तर त्यांच्या जिल्ह्यातल्या, मतदारसंघातल्या स्थानिक अडचणीमुळे ते ठाकरे गटात थांबून आहेत. लवकरच त्यांचे घर रिकामे होईल. ३ खासदार आणि ८ आमदार लवकरच आमच्याकडे येतील असे प्रतापराव जाधव एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले.  दरम्यान याआधी १ खासदार बाळासाहेबांच्या शिवसेनेत येतील असा दावा खा.जाधवांनी केला होता, त्यानंतर लगेच खा. गजानन किर्तीकर यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता, त्यामुळे आता खा. जाधव यांचा दावा कितपत खरा ठरतो व केव्हा ठरतो याकडे राजकीय वर्तुळाच्या नजरा लागून आहेत.