भर पावसाळ्यातही रंगतोय लढतीचा थरार! 41 जागांसाठी 132 अर्ज !! 5 ग्रामपंचायत मधील निवडणूक ठरली चुरशीची

 
बुलडाणा ( विशेष प्रतिनिधी:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) पावसाच्या अंदाजावर आधारित निवडणुकांचा प्रयोग ठरलेल्या जिल्ह्यातील 5 ग्राम पंचायत च्या सार्वत्रिक निवडणुकाच्या नामांकन च्या अखेरच्या दोन दिवसानी अखेर रंग भरला! अंतीम 2 दिवसात 41 जागांसाठी 132 उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने अखेर या निवडणुकाही चुरशीच्या ठरणार हे सध्या गायब असलेल्या सूर्य प्रकाशा इतके स्पष्ट झाले आहे.
 खामगाव तालुक्यातील नवगठित खामगाव ग्रामीण ग्राम व पिंप्री धनगर च्या प्रत्येकी 7 जागांसाठी आणि मलकापूर तालुक्यातील उमाळी ( 11 जागा) ,  बेलाड ( 9 जागा) आणि आळंद( 7 जागा) या ग्राम  पंचायत च्या 41 सदस्य पदासाठी ही निवडणूक होऊ घातली आहे. 4 ऑगस्टला होणाऱ्या लढतीसाठी अंतिम 2 दिवसात तब्बल 132 उमेदवारी अर्ज दाखल झाले. यामुळे प्रत्येक ठिकाणी चुरस ठरलेलीच! आता भर पावसाळ्यात व खरीप हंगामाच्या धामधुमीत प्रचार सुरू झालाय. 4 तारखेच्या मतदानात मतदारांचा उत्साह दिसून येतो काय? हा मजेदार प्रश्न उपस्थित झाला आहे.