जिल्हाधिकारी कार्यालयात राजकीय पदाधिकाऱ्यांचा उदोउदो...!! अधिकारी खाली बसतात पण गाव-पुढाऱ्यांना खुर्चीचा मोह आवरेना

 
samiti
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):   जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात जिल्ह्याच्या विकास कामांच्या अनेक बैठका पार पडत असतात. मात्र या बैठका एखाद्या राजकीय पक्षाच्या तर नाही ना असा प्रश्न पडण्याइतपत या बैठकांत राजकीय पुढाऱ्यांचा वावर दिसतो. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार हे वरिष्ठ अधिकारी बैठकीत खालच्या खुर्च्यांवर अन पक्षाचा शहर अध्यक्ष, शाखा प्रमुख असे पुढारी मात्र वरच्या खुर्च्या बळकावून तोऱ्यात बसल्याचे दिसतात.

 बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात विविध बैठका पार पडतात. जिल्ह्यातील आमदार, खासदार हे सुद्धा या सभागृहात विकास कामांच्या संबंधाने बैठका घेत असतात. अनेकदा लोकप्रतिनिधीच्या सोबत येणारे राजकीय पक्षाचे पदाधिकारीच या सभागृहातील व्यासपीठावरील खुर्च्या   बळकवतात.

त्यामुळे बऱ्याच वेळेला तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांनाही खालच्या खुर्च्यांवर बसण्याची वेळ येते. मात्र हे सभागृह जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी असून पक्षाचा प्रचार व प्रसिद्धी करण्यासाठी नाही याचे भान पुढाऱ्यांनी ठेवणे आवश्यक आहे.