उद्यापासून जिल्हा काँग्रेसचा महागाईविरुद्ध एल्गार; आठवडाभर चालणार महागाई मुक्त भारत सप्ताह आंदोलन
Mar 31, 2022, 19:13 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्रातील भाजप सरकार सातत्याने महागाईत वाढ करून सामान्य जनतेला लुटत आहे. ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीवेळी पराभवाच्या चिंतेने पेट्रोल, डिझेल , आणि सिलेंडरची भाववाढ भाजपने रोखून धरली होती. मात्र निवडणुका संपल्यानंतर पुन्हा जनतेची लूट सुरू केली असा आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी केला आहे. त्यामुळे जिल्हा काँग्रेसच्या वतीने उद्या १ एप्रिलपासून जिल्हाभरात महागाई मुक्त भारत सप्ताह आंदोलन करण्यात येणार आहे.जिल्ह्यातील काँग्रेसचे जेष्ठ नेते,आमदार, माजी आमदार, पक्षनेते, प्रदेश पदाधिकारी , ब्लॉक अध्यक्ष व जिल्हाभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन यशस्वी करावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी केले आहे.
अशी असणार आंदोलनाची रुपरेषा
उद्या १ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता ब्लाॅक, तालुका अध्यक्ष व लोकप्रतिनिधी सार्वजनीक ठिकाणी गॅंस सिलेंडर, स्कुटर, मोटरसायकल ला सजवुन केंद्र सरकारच्या महागाई विरोधात टाळ, मृदुंग व ढोल वाजवत घोषणाबाजी करणार आहे.
दिनांक २ ते ४ एप्रिल दरम्यान सर्व तालुक्यांच्या मुख्यालयी महागाई विरोधात जनजागृती, लाॅगमार्च व पदयात्रेचे आयोजन करण्यात येणार आहे. दिनांक ७ एप्रिल रोजी मुंबई येथे महागाई मुक्त भारत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
आंदोलनात काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी केले आहे.