पावसामुळे मंगरूळच्या शेतकऱ्यांच्या मिरची, टोमॅटो चे नुकसान! पाहणी करण्यासाठी कर्तव्यदक्ष आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे बांधावर

 
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  सततच्या पावसामुळे चिखली तालुक्यातील प्रगतिशील शेतकऱ्यांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंगरूळच्या शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या समस्येची माहिती मिळताच कर्तव्यदक्ष आमदार तथा माजी मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली.  

 चिखली तालुक्यातील मंगरूळ हे गाव प्रगतिशील शेतकऱ्यांचे गाव म्हणून ओळखले जाते. या गावातील बहुतांश शेतकरी उच्च दर्जाचे भाजीपाला पिकांचे उत्पादन घेतात. मात्र गेल्या काही दिवसांत झालेल्या वादळी पावसामुळे गावातील शेतकऱ्यांचे शेडनेट तसेच टोमॅटो व मिरची पिकांचे मोठे नुकसान झाले. सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली.

नुकसान झालेल्या शेतांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली पाहिजे अशा आवश्यक सूचना डॉ. शिंगणे यांनी संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष गजानन वायाळ, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कृष्णा मिसाळ व परिसरातील बहुतांश शेतकरी उपस्थित होते.