डॉ. शिंगणे आघाडीचा धर्म पाळत नाहीत, श्रेय लाटण्यासाठी साखरखेर्डा ग्रामीण रुग्णालयाचे दुसऱ्यांदा भूमिपूजन; माजी आमदार शशिकांत खेडेकरांची टीका, शिवसैनिकांनी व्हायरल केल्या आयत्या बिळावर नागोबाच्या पोस्ट

 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः साखरखेर्डा येथील ग्रामीण रुग्णालयाचे भूमिपूजन करण्यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे आज, २८ फेब्रुवारीला येत आहेत. मात्र भूमिपूजन सोहळ्याआधीच राजकारण पेटले आहे. "मी आमदार असताना सभागृहात प्रश्न मांडून निधी मंजूर करून घेतला. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी १४ सप्टेंबर २०१९ रोजी भूमिपूजन केले. आता ग्रामीण रुग्णालयाचे काम २५ ते ३० टक्के पूर्ण झालेले असताना दुसऱ्यांदा भूमिपूजन कशासाठी, असा सवाल माजी आमदार शशिकांत खेडेकर यांनी केला असून, पालकमंत्री आघाडीचा धर्म पाळत नसल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांनीसुद्धा या भूमिपूजन सोहळ्याचा जाहीर निषेध केला आहे. बहुसंख्य शिवसैनिकांनी व्हाॅट्स ॲपवर स्टेटस ठेवत "आयत्या बिळावर नागोबा, साखरखेर्डा ग्रामीण रुग्णालयाच्या भूमिपूजन सोहळ्याचा जाहीर निषेध' अशी पोस्ट केली आहे.

श्री. खेडेकर बुलडाणा लाइव्हशी बोलताना म्हणाले, की पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे हे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असलेल्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत. मात्र ते आघाडीचा धर्म पाळत नाहीत. १६ ऑगस्ट २०१९ रोजी शासनाने आदेश काढून साखरखेर्डा ग्रामीण रुग्णालयासाठी निधी मंजूर केला होता. त्यानंतर १४ सप्टेंबर २०१९ रोजी भूमिपूजन केले होते. आता २० ते २५ टक्के काम प्रगतिपथावर असताना न केलेल्या कामाचे श्रेय लाटण्याचा हा प्रकार आहे.

आमदार झाल्यानंतर डॉ. शिंगणे यांनी मतदारसंघात कामे केली नाहीत. अडीच वर्षांत काय केले असे लोक विचारतात तेव्हा याआधी मंजूर झालेल्या, भूमिपूजन झालेल्या व टेंडर निघालेल्या कामांचे पुन्हा पुन्हा भूमिपूजन करण्याचा सपाटा पालकमंत्र्यांनी लावला आहे. आघाडी असताना त्यांनी असे वागणे उचित नाही. आघाडी धर्म म्हणून त्यांनी शिवसेना नेत्यांना विश्वासात घ्यायला हवे होते, असेही शशिकांत खेडेकर म्हणाले.