जिल्ह्याचे पालकमंत्री आले अन् राजकारण करून गेले! विकासाच्या नावानं बोंब..किमान "एवढं" तरी करायला हव होत..!!

 
बुलडाणा( कृष्णा सपकाळ: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील १ ऑक्टोबरच्या मुहूर्तावर जिल्ह्यात येऊन गेले. एकाच दिवसात मेहकर, चिखली आणि जळगाव जामोद अशा तीन संभांना संबोधित केले. जबरदस्त भाषणबाजी केली. अन् संध्याकाळी पुन्हा त्यांच्या जिल्ह्यात निघून गेले.जिल्ह्यासाठी आणि जिल्ह्यातल्या शिवसेनेला काही कमी पडू देणार नाही असे भाषणात ते म्हणालेही मात्र पालकमंत्री म्हणून पहिल्यांदा जिल्ह्यात आलेले असताना त्यांना अधिक काहीतरी करता आले असते,मात्र अख्खा दिवस त्यांनी राजकारणात घालवला.

सकाळी बुलडाण्यात आल्यानंतर आ. संजय गायकवाड यांच्या संकल्पनेतून साकार होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचे भूमिपूजन पालकमंत्र्यांनी केले अन् थेट मेहकरचा रस्ता धरला. अर्थात त्याचे कारण म्हणजे पहिलाच दौरा राजकीय होता. एका दिवसात लांब लांब अंतरावरच्या ३ संभांना संबोधित करायचे होते. त्यामुळे जिल्हा यंत्रणेशी परिचय करुन घ्यायला त्यांना वेळच मिळाला नाही.

मात्र दौऱ्याचे  योग्य नियोजन  केले असते तर  जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा, जिल्हा परिषद या प्रमुख कार्यालयात काय चालू आहे हे त्यांना पाहता आले असते. किमान जिल्हास्तरावर काम करणाऱ्या यंत्रणेची तोंडओळख करून घेता आली असती. मात्र तसे न करता दिवसभर ठाकरेंवर तोंडसुख घेण्यात त्यांनी धन्यता मानली. 

 राजकीय दृष्ट्या जिल्ह्यातील तिन्ही सभा सुपरहिट ठरल्या. मेहकरात युवासेनेच्या वतीने काढण्यात आलेली मोटारसायकल रॅली भव्यदिव्य आणि सभाही भव्यदिव्य ठरली. चिखली आणि जळगाव जामोद मध्येही भगवा जनसागर उसळल्याचे चित्र होते. सोयाबीन सोंगण्याचा हंगाम असताना सुद्धा गुलाबराव पाटलांना ऐकायला लोकांनी गर्दी केली होती. मात्र चार गोष्टी जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने त्यांना करता आल्या असत्या, त्या न करता त्यांनी आले अन् राजकारण करून गेले असेच खेदाने म्हणावे लागेल.