जिल्हा काँग्रेसचे बॉस मुकुल वासनिक आज मेहकरात; भारत जोडो यात्रेआधी गटबाजी करणाऱ्या नेत्यांना जोडण्याची गरज; मेहकर शहरात कासम गवळी इकडे तर उमाळकर तिकडे...

 
मेहकर( अनिल मंजुळकर: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्हा काँग्रेसचे निर्विवाद सर्वेसर्वा, काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राज्यसभा खासदार मुकुल वासनिक सध्या राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेच्या तयारीसाठी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आज, ७ नोव्हेंबरला ते अंतर्गत गटबाजी ने ग्रस्त असलेल्या मेहकरात येत आहेत. दरम्यान येतच आहात तर भारत जोडो यात्रेआधी इथल्या गटबाजी करणाऱ्या नेत्यांना आधी जोडण्याची गरज असल्याच्या भावना काँग्रेसच्या काही निष्ठावान कार्यकर्त्यांनी बुलडाणा लाइव्ह जवळ व्यक्त केल्या.

thakre

       ( जाहिरात👆🏻 )

 मेहकर तालुक्यात तालुकाध्यक्ष देवानंद पवार झपाट्याने काँग्रेस वाढवीत आहेत. शहरात माजी नगराध्यक्ष कासम गवळी यांनी काँग्रेस जिवंत ठेवली. मात्र स्वतःला प्रदेश पातळीवरील नेते म्हणुवून घेणाऱ्या  श्याम उमाळकरांचे आणि कासम गवळी यांचे काही पटत नाही.त्याची काय कारणे आहेत हे त्या दोघांनाच माहीत. मात्र आपण प्रदेश पातळीवरील नेते असल्याने आपल्याला शहर काँग्रेसमध्ये योग्य तो सन्मान मिळाला पाहिजे अशी अपेक्षा उमाळकरांची असते म्हणे..आता तुम्ही सांगा सन्मान हा काय मागून मिळवायची गोष्ट असते का. त्यातही उमाळकरांकडे पक्षाचे पद नाही अशी स्थिती गेल्या कित्येक वर्षांपासून नाही. सातत्याने पदाला चिकटून असणाऱ्या उमाळकरांचे काँग्रेस वाढवण्यासाठीचे योगदान काय असे अनेक प्रश्न एक गट सातत्याने उपस्थित करीत असतो. 

  या दोन्ही नेत्यांच्या आपसातील मतभेदांमुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांत सुद्धा दुफळी निर्माण झाली आहे. त्यामुळे राहुल गांधी प्रचंड मेहनतीने भारत जोडो यात्रा करीत असताना मेहकरातील तुटलेली काँग्रेस जोडण्याचे आव्हान आता वासनिकांना पेलवावे लागणार आहे. अर्थात वासनिकांची पक्षासाठी वाहून घेतलेली कार्यशैली पाहता "ये तो उनके लिये बाए हाथ का खेल है" असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.