८ वर्षांच्या राजकीय विजनवासानंतर थेट वरिष्ठ सभागृहात! ४ दशके लोकसभेच्या 'आत- बाहेर' !! संघटनेला वाहून घेतलेल्या नेत्याचा मजेदार ट्रॅक रेकॉर्ड ;
गांधी घराण्याचा विश्वास जिंकणाऱ्या मुकुल वासनिकांनी राजकीय धडे नागपूर विश्वविद्यालयात गिरविले. त्याकाळी स्ट्रॉंग असलेल्या एनएसयुआय मध्ये ते तयार झाले. सन १९८० मध्ये त्यांचे वडील बाळकृष्ण वासनिक यांना बुलडाणा लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी मिळाली अन ते खासदार झाले. ती मिसरूड फुटू लागलेल्या मुकुल नामक युवकाची बुलडाण्याशी पहिली ओळख. पहिल्याच भेटीत ते बुलडाण्याच्या प्रेमात पडले असे सांगता येईल! याचे कारण १९८४ च्या लढतीनंतर ते बुलडाण्याचे खासदार झाले. (आजच्या भाषेत सांगायचे झाल्यास त्यांनी पप्पांचे तिकीट कापून उमेदवारी मिळविली असे विरोधक सांगू शकतात) . त्यावेळी जेमतेम पंचविशी पार केलेला हा युवानेता सभागृहातील सर्वात तरुण खासदार ठरला.१९८९ ची लढत त्यांच्यासाठी वाईट स्वप्न अन राजकीय जीवन उध्वस्त करणारी ठरली. एनएसयुआय च्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांचा झालेला पराभव चर्चेचा अन सुखदेव नंदाजी काळे याना जायंट किलर ठरविणारा ठरला. यानंतर १९९१ मध्ये विजय,( १९९३ मध्ये केंद्रीय राज्यमंत्री) १९९६ मध्ये पराजय, १९९८ मध्ये जय आणि १९९९ व २००४ मध्ये सलग पराभव असा त्यांचा बुलडाणा जिल्ह्यातील मधील राजकीय प्रवास राहिला. बुलडाणा खुला झाल्यावर त्यांनी २००९ ची निवडणूक रामटेक मधून लढवीत खासदारकी आणि केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रिपद एकसाथ च मिळविले. लोकसभेत ते असे आतबाहेर होत राहिले.
ब्रेक के बाद सभागृहात
दरम्यान २०१४ च्या निवडणुकीत पराभूत झाल्यावर ते खासदारकीपासून तब्बल ८ वर्षे वंचित राहिले. दरवेळी राज्यसभेच्या निवडणूका लागल्या की त्यांचे अंतिम टप्प्या पर्यंत आघाडीवर राहून शेवटी त्याच्यावर फुली लागायची ! यंदाही तसेच होते की काय असे वाटत असतानाच त्यांची राजस्थान मधून का होईना राज्यसभेवर वर्णी लागली अन त्यांची खासदारकी निश्चित झाली. ( प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री राहते याचा त्यांना प्रत्यय आला असावा) यादरम्यान या मुरब्बी , धूर्त, चाणाक्ष नेत्याने एनएसयुआय चे अध्यक्षपद, राष्टीय सरचिटणीस, महासचिव ही पदे सांभाळली. एन एसयुआय, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस सह बिहार, राजस्थान, केरळ, मध्यप्रदेश राज्याचे प्रभारीपदाची जवाबदारी पेलली. दीर्घ कालावधी नंतर त्यांना राजकीय पद मिळाले. अवघ्या वय वर्षे ६२ मध्ये स्वबळावर इतकी मोठी राजकीय मजल त्यांनी मारली. पण त्यांचा राजकीय प्रवास यावरच संपणारा नाहीये....