भर पावसाळ्यात 5 ग्राम पंचायतीत धुमशान! बांधावर जाऊन होतोय प्रचार !! 4 ऑगस्टला 14 केंद्रावर मतदान..!

 
बुलडाणा ( विशेष प्रतिनिधी:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): पावसाच्या अंदाजावर आधारित निवडणुकीचा प्रयोग ठरणाऱ्या 5 ग्राम पंचायतीच्या लढतीत भर पावसातही काट्याची लढत रंगली आहे! येत्या 4 ऑगस्टला होणाऱ्या मतदानासाठी 14 मतदान केंद्र निर्धारित करण्यात आली आहे.

खामगाव तालुक्यातील पिंप्री धनगर व खामगाव ग्रामीण या 2 ग्राम पंचायतीच्या प्रत्येकी 3 प्रमाणे 6 प्रभागासाठीची  निवडणूक सध्या रंगात आहे. याचप्रमाणे मलकापूर तालुक्यातील बेलाड व आळंद या प्रत्येकी 3 वर प्रभाग तर 4 प्रभाग असलेल्या उमाळी मध्येही काट्याची चुरस असल्याचे चित्र आहे. भर पावसात आणि खरिपाच्या धामधुमीत प्रचार सुरू असल्याने रिंगणातील उमेदवारांना शेत शिवारात अन धुऱ्यापर्यंत जाऊन मतदारांशी संपर्क साधावा लागत आहे. मतदार सकाळीच शेतात आणि त्यांच्या मागे चिखल तुडवित प्रचाराला भिडलेले भावी मेंबर असा मजेदार राजकीय माहौल आहे. उर्वरित प्रचार मग रात्री बेरात्री नजीकच्या ढाब्यावर होत असल्याची चर्चा आहे. 

 5 ला मोजणी अन गुलालाची उधळण...

दरम्यान 5 ग्रामपंचायतच्या निवडणुकीची जय्यत प्रशासकीय तयारी करण्यात येत आहे. यासाठी 14 केंद्र राहणार आहे. खामगाव तालुक्यातील मतदान जिप प्राथमिक शाळा व संस्कार ज्ञानपीठ, लकी सानंदा स्कुल येथे तर मलकापूर तालुक्यात जिल्हा परिषदांच्या शाळेत केंद्र राहणार आहे. 5 तारखेला खामगाव ची मतमोजणी महात्मा गांधी  सभागृह तर मलकापूर ची मोजणी तहसील कार्यालयात सकाळी 10 वाजता सुरू होणार आहे.  जवळपास 132 उमेदवार पैकी  बाजी कोण मारणार हे सध्या नक्की नसले तरी निकाल लागल्यावर ढगाळलेले आभाळ गुलालानी पण माखणार आहे हे नक्की !...