पदवीधरांच्या प्रश्नांवर धिरज लिंगाडे यांना पाठिंबा वाढतोय! महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना व शेतकरी कामगार पक्ष लिंगाडे यांच्या पाठीशी; वाचा काय आहेत कारणे..
पत्रात म्हटले आहे की, "जुनी पेन्शन योजना पूर्वत लागू होणे ही बाब राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांच्या भविष्य सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाची असल्याने महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना त्यासाठी सातत्याने प्रयत्न व मागणी करीत आहे. त्या दृष्टीने काँग्रेस पक्ष नेतृत्वाने जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करण्यात बाबत घेतलेला पुढाकार आणि त्यासोबतच राजस्थान, छत्तीसगड तसेच हिमाचल प्रदेश राज्यातील आपल्या काँग्रेस पक्षाच्या सरकारने प्रत्यक्ष जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू केल्याने आपला पक्ष आणि तेथील शासन कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा आत्मविश्वास तेथील कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे. ही बाब कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने अभिनंदनीय आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना सुद्धा जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू होण्यासाठी काँग्रेस पक्षाने उघड समर्थन दर्शविले आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष फक्त निवडणुकीतच नाही तर प्रत्यक्ष विधिमंडळात सुद्धा जुनी पेन्शन चा आवाज बनवून जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न करेल असा आशावाद राज्यातील १७ लाख कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे. अमरावती विभाग पदवीधर मतदार संघात महाविकास आघाडीचे श्री. धीरज लिंगाडे यांना महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे पूर्ण समर्थन देत आहोत. राज्यातील १७ लाख कर्मचाऱ्यांची ताकद जुनी पेन्शनसाठी महाविकास आघाडीच्या पाठीशी उभी राहील असा आपणास विश्वास देत आहोत."असे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या निवडणूक राज्य सहप्रभारी सौ.राजश्री गोविंद उगले व सौ .गीता वितेश खांडेकर यांच्या स्वाक्षऱ्या पत्रावर आहेत.
संविधानाच्या रक्षणाकरिता धर्मांध विचारसरणीच्या उमेदवाराचा पराभव करा: शेकापचे आवाहन
भारतीय शेतकरी कामगार पक्षाने देखील धिरज लिंगाडे यांना पाठिंबा घोषित केला आहे. लिंगाडे यांच्या विजयाकरिता शेकाप पक्षाचे कार्यकर्ते, शिक्षक, पदवीधर विद्यार्थी, युवक व सर्व आघाड्यांवरील कार्यकर्त्यांनी प्रयत्नांची शिकस्त करावी असे निर्देश शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी दिले आहेत. भारतीय संविधानाच्या रक्षणाकरिता धर्मांध आणि जात जमातवादी विचारसरणीच्या पक्षाच्या उमेदवारांचा दणदणीत पराभव करा असे आवाहनही शेकापचे जयंत पाटील यांनी केले आहे.