धर्मवीर की स्वराज्यरक्षक?आ.अमोल मिटकरींचे चॅलेंज; म्हणाले, हरलेल्यांना राजीनामा द्यावा लागेल! २७ फेब्रुवारी नंतर सरकार कोसळणार असल्याची केली भविष्यवाणी

 
mitkari
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते तर ते स्वराज्य रक्षक होते अशी भूमिका मांडली होती. त्यावर सत्ताधाऱ्यांनी पवारांवर टीका करत, छत्रपती संभाजी राजे स्वराज्य रक्षक आहे असे वक्तव्य केले. यावर आ.मिटकरी यांनी टीकास्त्र सोडत 'छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर की स्वराज्य रक्षक?' याबाबत डिबेटचे चॅलेंज केले आहे. हरला तो राजीनामा देईल, असे ते समाज माध्यमांसमोर स्पष्ट बोलले आहेत.

बुलडाणा तालुक्यातील देऊळघाट येथे राष्ट्रवादी पक्षातर्फे 'महापुरुषांच्या सन्मानार्थ सन्मान यात्रा' समारोप कार्यक्रमाचे आयोजन ३१ डिसेंबरला करण्यात आले होते. या कार्यक्रमाला रवाना होण्यापूर्वी बुलडाणा येथे एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हे विधान केले. विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते तर ते स्वराज्य रक्षक होते असे विधान तत्पूर्वी केले. यावर सत्ताधारी पक्ष व संबंधित शिंदे गटाच्या नेत्यांनी अजित पवारांना टीकेचे लक्ष केले. भाजपा व शिंदे गटातील नेत्यांनी म्हटले की, छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर होते.

परंतु आमदार अमोल मिटकरी यांनी सत्ताधाऱ्यांवर तोफ डागली. ते म्हणाले की, सत्ताधारी यांना कधीपासून बुद्धी आली. धर्मवीर कुणालाही म्हटले जाते. शहरात येत असताना आ.संजय गायकवाड यांच्याही नावापुढे धर्मवीर लिहिल्याचे मी पाहिले. छत्रपती संभाजी महाराजांना असलेली स्वराज्य रक्षक ही प्रतिमा जागतिक महत्त्व अधोरेखित करणारी आहे. धर्मवीर म्हणून खूजेपणाचे पाप भाजपा व शिंदे गटातील नेते करीत आहे. छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर की स्वराज्य रक्षक? या विषयावर त्यांनी माझ्याशी डिबेट करावी. आणि हारलेल्यांनी राजीनामा द्यावा. असे आव्हान त्यांनी यावेळी दिले. अजित पवार यांच्यावर टीका करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे. विशेष म्हणजे २७ फेब्रुवारीपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. या अधिवेशनात महाराष्ट्रात सत्तांतर होईल, असा ही दावा आ. अमोल मिटकरी यांनी यावेळी केला.