दिल्ली डायरी: ४ वृत्त विश्लेषण ! पालकमंत्री नियुक्तीपासूनच पडली असंतोषाची ठिणगी!!त्यानंतर निर्माण झालेल्या 'खदखद' चा झाला महास्फोट!बुलडाणा लाइव्ह साठी संजय मोहिते थेट नवी दिल्लीवरून..!
शिवसेनेच्या महा बंडाळीची ही ३ ठळक कारणे सेनेचा गड उध्वस्त होण्यास कारणीभूत असल्याचे चित्र आता स्पष्ट होऊ लागले आहे. बुलडाणा जिल्ह्या पुरते सांगायचे झाल्यास लोकसभा निवडणुकीत खासदार प्रतापराव जाधव यांनी सलग ३ टर्म विजय मिळविला. मेहकरात संजय रायमूलकर अजिंक्य तर बुलडाण्यात आक्रमक नेते म्हणून परिचित संजय गायकवाड आमदार झाले. सिंदखेराजात पक्षाने जबर झुंज दिली. पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या मध्ये पक्षाचे बऱ्यापैकी सदस्य, विधानपरिषद सदस्य श्रीकांत देशपांडे सेनेचेच.
यामुळे पालकमंत्री सेनेचाच राहील हा नेत्यांना दृढ विश्वास. पण तसे झाले नाही. यामुळे सत्तेतील राष्ट्रवादीचा प्रभाव दिसून आला. लोकसभेत दोन हात करणाऱ्या नेत्याकडे जायचे कसा? हा बिकट व सलणारा प्रश्न अस्वस्थ करणारा ठरला. याउप्परही संयम ठेवणाऱ्या दोन्ही आमदारांना विकास निधी मिळविताना नाकी नऊ यायला लागले. सतेच्या व तिजोरीच्या चाव्या राष्ट्रवादीच्या 'दादा' नेत्याकडे. त्यामुळे पदोपदी कटू अनुभव यायला लागले .
यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दाद मागावी तर ते कायम ' नॉट रीचेबल'! ज्येष्ठ आमदार याना तर अलीकडे विरोधकांप्रमाणे रस्त्यावर आंदोलन करावे लागले. मग दिलासा तो एकच आपले रडणे खदखद ऐकून घेणारे नेते एकनाथ शिंदे ! यामुळे राजकीय महास्फोट झाला अन सर्वच संपले. ना. शिंदे यांच्या एल्गार मध्ये जिल्ह्याचे दोन्ही आमदार पहिल्या फळीत का? याच्या काही उत्तरात वरील ३ उत्तरांचाही समावेश आहे...