पराभव पचवता आला नाही; ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल लागताच पराभूत पॅनेल कडून दगडफेक, भाजपा कार्यकर्त्याचा मृत्यू
Dec 20, 2022, 14:33 IST
जळगाव ( लाइव्ह ग्रुप नेटवर्क): राज्यातल्या साडेसात हजार ग्रामपंचायतींचे निकाल आज, २० डिसेंबरला समोर येत आहेत. दरम्यान काही ठिकाणी निवडणूक निकालानंतर राडा झाल्याचे समोर येत आहे. बुलडाणा येथील तहसील कार्यालयासमोर फेरमतमोजणी दरम्यान येळगावच्या पराभूत उमेदवारांच्या समर्थकांनी विजयी उमेदवारांच्या समर्थकांना धक्काबुक्की केल्याची घटना घडली. तर जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील टाकळी ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर दोन गट आपसात भिडले. पराभूत उमेदवारांच्या समर्थकांनी दगडफेक केल्याने भाजपा कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे.
जामनेर तालुक्यातील टाकळी खुर्द येथील ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर विजयी उमेदवारांची गावात मिरवणूक सुरू होती. त्याच वेळी पराभूत झालेल्या विरोधकांनी मिरवणुकीवर तुफान दगडफेक केली. यात धनराज श्रीराम माळी (३२) या भाजपा कार्यकर्त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी २० ते २५ संशयितांना ताब्यात घेतले असून गावात तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. भाजपच्या वतीने या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे.