ठरल..! आता करेक्ट कार्यक्रम!भाजपच्या मिशन लोकसभेसाठी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव उद्यापासून जिल्ह्यात! खा. जाधवांची धाकधूक वाढणार

 
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाण्याचा पुढचा खासदार भाजपचाच अशी घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या बुलडाणा दौऱ्यात केली होती. बुलडाण्याच्या मिशन लोकसभेची जबाबदारी असलेले रणनीतीकार केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव पुढच्या १८ महिन्यांत ६ वेळा बुलडाणा लोकसभेचा दौरा करणार असल्याचेही ते म्हणाले होते. आता प्रत्यक्ष बुलडाणा लोकसभेचा करेक्ट कार्यक्रम करायचाच असा चंग बांधलेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी उद्या म्हणजेच १८ सप्टेंबर रोजी  केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव जिल्ह्यात येणार आहेत. यादव यांच्या दौऱ्याची अधिकृत घोषणा भाजप जिल्हाध्यक्ष आकाश फुंडकर यांनी खामगावात पत्रकार परिषद घेऊन केली.

 देशभरातील १४४ आणि महाराष्ट्रातील १६ लोकसभा मतदारसंघावर भाजपने लक्ष केंद्रित केले आहे.  त्यात बुलडाणा लोकसभेचा सुद्धा समावेश आहे. काही झाले तरी २०२४ ला बुलडाण्याचा खासदार भाजपचाच असा चंग भाजपने बांधला होता. त्यासाठीची तयारी,बैठका सुद्धा झाल्या.  मात्र राज्यात सत्तापालट झाल्यावर जागा वाचविण्याच्या उद्देशाने खा. जाधव शिंदेगटात सामील झाले. त्यामुळे आता भाजपच्या मिशन लोकसभेचे काय असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारल्या जात होता. मात्र असे असले तरी भाजपने त्यांच्या तयारीवर व पूर्वनियोजित कार्यक्रमात कोणताही बदल केला नाही, यावरूनच भाजप मिशन बुलडाणा लोकसभेवर ठाम असल्याचे स्पष्ट झाल्या.     

 त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या बुलडाणा दौऱ्यात कार्यकर्त्यांच्या पोटातलं ओठावर आणल आणि पुढचा खासदार भाजपचा अशी घोषणा करून टाकली. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्यावरच बुलडाणा लोकसभेची जबाबदारी का सोपवली या बद्दल बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना विस्तृत मार्गदर्शन केले होते. आता स्वतः केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव उद्यापासून बुलडाणा लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते बुलडाणा लोकसभेत समाविष्ट असणाऱ्या सहाही विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.  भाजप जर मिशन लोकसभेची तयारी करीत असेल तर आपले काय असा प्रश्न विद्यमान खासदारांना पडला नाही तर नवलच..त्यामुळे या विचाराने त्यांचीही धाकधूक वाढणार आहे.