भारत जोडो यात्रेत आज सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल! आजचा मुक्काम निमखेडीतच; राहुल गांधीचा आजचा मुक्काम छत्रपती संभाजीनगरात; उद्या सकाळी पुन्हा निमखेडीत दाखल होणार..

 
जळगाव जामोद(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): १८ नोव्हेंबरला बुलडाणा जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर राहुल गांधींची भारत जोडो यात्रा काल, २० नोव्हेंबरला मध्यप्रदेशात मुक्कामी जाणार होती. मात्र , खा.राहुल गांधींनी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी जाण्याचा निर्णय घेतल्याने यात्रेचा जिल्ह्यातला मुक्काम दोन दिवसांनी वाढला आहे. काल, तातडीने निमखेडी येथेच मुक्कामाची व्यवस्था उभारण्यात आल्यानंतर निमखेडी येथेच मुक्काम करण्यात आला.आज २१ नोव्हेंबरला भारत जोडो यात्रेला तात्पुरता ब्रेक असला तरी मुक्कामाच्या ठिकाणी आज विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. दरम्यान खा.राहुल गांधी हे थोड्या वेळात हेलिकॉप्टर ने छत्रपती संभाजीनगरला जाणार आहेत. तिथून खाजगी विमानाने ते गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी जातील.

खा. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रात प्रचंड प्रतिसाद मिळाला. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार काल,२० नोव्हेंबरला महाराष्ट्रातील शेवटचा दिवस होता, कालच यात्रा मध्यप्रदेशात जाऊन मुक्कामी थांबणार होती. मात्र खा. राहुल गांधींना गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी जायचे असल्याने यात्रेचा महाराष्ट्रातील मुक्काम वाढवण्यात आला. बुलडाण्याचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रचंड मेहनत घेत निमखेड येथे तातडीची मुक्कामाची व्यवस्था उभारली व एक हेलिपॅड देखील तयार करण्यात आले.

दरम्यान कालचे नियोजित कार्यक्रम आटोपल्यानंतर खा. राहुल गांधी यांच्यासह यात्रेकरुंनी निमखेडी येथे मुक्काम केला. आज, २१ नोव्हेंबरला खा. राहुल गांधी हेलिकॉप्टरने छत्रपती संभाजीनगरला जातील. तेथून खाजगी विमानाने गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी जातील. तिथल्या सभा आटोपल्यानंतर ते पुन्हा संध्याकाळी छत्रपती संभाजीनगर दाखल होणार आहे.  त्यांचा आजचा मुक्कामही छत्रपती संभाजीनगरात होणार असून  उद्या २२ नोव्हेंबरला हेलिकॉप्टरने ते निमखेडी येथे परत येतील. त्यानंतर यात्रा पुन्हा नियोजित मार्गाने मार्गस्थ होईल.