जिल्ह्यात ९५ पेक्षा जास्त ग्रामपंचायतीवर काँग्रसचा विजय; जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रेंचा दावा; म्हणाले भाजपला केवळ १८ जागा, भाजपचे जिल्हाध्यक्ष रेटून खोटे बोलत असल्याचाही केला आरोप
जिल्ह्यातल्या २७९ ग्रामपंचायतींपैकी काँग्रेसने ९५ जागी विजय मिळवून जिल्ह्यात काँग्रेस पक्षच अव्वल असल्याचे दाखवून दिले आहे.खासदार राहुलजी गांधी यांच्या भारत जोडो यात्रेने बुलडाणा जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघाले. पदयात्रेला सर्व जाती, धर्मांच्या लोकांचा प्रतिसाद मिळाला हेच ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालावरून स्पष्ट होत असल्याचेही राहुल बोंद्रे म्हणाले. ग्रामीण भागात काँग्रेसची पाळेमुळे आजही घट्ट आहे. जनतेने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षावर दाखवलेला विश्वास आम्ही सार्थ ठरवू असेही राहुल बोंद्रे म्हणाले.
भाजपचे "गिरे तो भी टांग उपर..."
दरम्यान भाजपला जनतेने सपशेल नाकारले आहे. भाजपचा परतीचा प्रवास आता सुरू झालेला आहे. मात्र तरीही "गिरे तो भी टांग उपर" या नितीने बोगस आकड्यांच्या प्रपोगंडा करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही राहुल बोंद्रे यांनी केला आहे. "खोटं बोला पण रेटून बोला" या परंपरेला साजेस काम भाजपच्या जिल्हाध्यक्षांकडून होत आहे. भाजपचे विजयाचे दावे खोटारडे आहेत. भाजप जिल्हाध्यक्षांच्या खामगाव मतदारसंघात व चिखली विधानसभा मतदारसंघात तर भाजपचा दारुण पराभव झाला असेही राहुल बोंद्रे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. काँग्रेसनंतर दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेसला ५० जागा, तिसऱ्या क्रमांकावर शिंदे सेनेला ३७ जागा, चौथ्या क्रमांकावर उद्धव ठाकरेंच्या सेनेला ३० तर पाचव्या क्रमांकावर भाजपला १८ जागा मिळाल्याचे राहुल बोंद्रे यांनी म्हटले आहे. यासोबतच वंचित बहुजन आघाडी ४, अपक्ष ४, स्थानिक आघाडी ८, काँग्रेस मित्र पक्ष १४ व भाजप मित्र पक्ष १६ असे जिल्ह्यातील संख्याबळ असल्याचेही राहुल बोंद्रे यांनी म्हटले आहे.