काँग्रेसचे राज्यपातळीवरील नेते शेगावात दाखल! राहुल गांधींच्या स्वागतासाठी सतंनगरी सजली! सभा "न भूतो न भविष्यती" करण्याचा आयोजकांचा निर्धार..

 
shegav
शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खा. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला सर्वच स्थरांतून मोठा पाठिंबा मिळतोय. उद्या १८ नोव्हेंबरला यात्रा बुलडाणा जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. शेगावात उद्या सायंकाळी महाराष्ट्रातील सर्वात मोठी जाहीर सभा पार पडणार असून या सभेला ५ लाखांच्यावर नागरिक गर्दी करणार असल्याचा दावा आयोजकांच्या वतीने केल्या जातोय. "न भूतो न भविष्याती" अशी सभा राहील असा आत्मविश्वास आयोजकांना आहे. दरम्यान जिल्हा काँग्रेस कमिटीने महिनाभरापासून प्रचंड मेहनत घेत या सभेची जय्यत तयारी केली आहे. शेगावात अखिल भारतीय पातळीवरील व राज्यपातळीवरील काँग्रेसचे नेते दाखल व्हायला सुरुवात झाली आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज, १७ नोव्हेंबरला शेगावात दाखल झाले आहेत. राहुल गांधी पहिल्यांदाच शेगावात येत असल्याने शहरातील सामान्य नागरिकांसह काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये देखील प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. उद्या , १८ नोव्हेंबरला बाळापूर मार्गे भारत जोडो यात्रा शेगावात दाखल होईल. सकाळी ११ वाजता जवळा पळसखेड फाट्यावर यात्रेचे स्वागत करण्यात येईल. वरखेड फाट्यावर वारकऱ्यांच्या वतीने आयोजित रिंगण सोहळ्यात स्वतः खा. राहुल गांधी पाऊली खेळणार आहेत. कपाळावर गंध, वारकऱ्यांची वेशभूषा, टोपी आणि खांद्यावर वीणा अशी खा. राहुल गांधींची वेशभूषा राहील. दुपारी चारला राहुल गांधी श्री संत गजानन महाराजांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहेत. त्यानंतर बाळापूर रोडवरील नियोजित सभेला खा. राहुल गांधी संबोधित करतील. भारत जोडो यात्रेतील ही महाराष्ट्रातील शेवटची सभा असल्याने ती ऐतिहासिक आणि प्रचंड गर्दीची करण्याचा निर्धार जिल्हा व प्रदेश काँग्रेस कमिटीने केला. शेगाव शहर काँग्रेसचे अध्यक्ष किरणबापू देशमुख यांनी " ही सभा आपल्या कार्यकाळात होणे ही भाग्याची बाब असल्याचे म्हटले आहे".
   
यांची मेहनत फळाला येणार..!

दरम्यान गेल्या महिनाभरापासून जिल्ह्याच्या संपर्क मंत्री यशोमती ठाकूर आणि जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात आमदार राजेश एकडे, प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, ज्ञानेश्वर दादा पाटील, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, स्वातीताई वाकेकर , रामविजय बुरुंगले,  शैलेंद्र पाटील, शहराध्यक्ष किरण बापू देशमुख,  कैलास देशमुख, तेजेंद्रसिंग चव्हाण , डॉ. जयवंतराव खेडेकर, प्रवीण सुरुशे यांच्यासह जिल्हा, तालुका, शहर पातळीवरील काँग्रेस कार्यकर्ते तन मन धनाने या कार्यक्रमाची तयारी करीत आहेत.