महागाई विरोधात काँग्रेस रस्त्यावर! पदाधिकाऱ्यासह हजारो कार्यकतें सहभागी! आंदोलन ठरले जंगी शक्ती प्रदर्शन..!

 
बुलडाणा ( विशेष प्रतिनिधी:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): ईडी विरोधातील विविध टप्प्यातील आंदोलनामुळे उत्साहित झालेल्या व गट तट विसरून एकवटलेल्या काँग्रेसने आज थेट रस्त्यावर उतरत गोरगरीब, सर्वसामान्यांचा वेदना व भांडवलदार धार्जिण्या सरकारविरोधात असलेला रोष वेशीवर टांगला! 13 तालुका स्थळी आज 5 ऑगस्टला आयोजित या आंदोलनात स्थानिक पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्ते खांद्याला खांदा लावून  सहभागी झाले.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने आजच्या महागाई विरोधातील आंदोलनाचे सुसज्ज नियोजन केले होते. त्याची काटेकोर अंमलबजावणी होईल याची दक्षता घेण्यात आल्याने   आज 13 तालुक्यांच्या मुख्यालयात आयोजित आंदोलन लक्षवेधी आणि क्वालिटी व क्वांटीटी या दोन्ही कसोट्यावर महायशस्वी ठरले! 'काँग्रेसका हाथ, गरीबोके साथ' हा संदेश देण्यात जिल्हाध्यक्ष राहुल बोन्द्रे आणि टीम काँग्रेस सफल ठरली. गगनभेदी घोषणा, तिरंगे झेंडे,  नेत्यांची आक्रमक  भाषणे, कार्यकर्त्यांमध्ये असलेला सळसळता उत्साह असा आंदोलनाचा माहौल होता.

 बुलडाणा, सिंदखेडराजा, नांदुरा, मलकापूर, खामगाव, मेहकर, लोणार, सिंदखेडराजा, देऊळगाव राजा, संग्रामपूर, शेगाव, मोताळा, जळगाव या सर्वच ठिकाणचे आंदोलन लक्षवेधी आणि सर्व सामान्यांना ' आमच्या सुखदुःखात काँग्रेस सहभागी' हा दिलासा देणारे ठरले. हा परमार्थ अलहिदा. पण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी काँग्रेस सज्ज असल्याचा संदेश देणारे आणि 'काँग्रेस झोपली' अशी कोल्हेकुई करणाऱ्या  टीकाकारांना सणसणीत चपराक ठरले.