काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची आज निवडणूक! मल्लिकार्जुन खरगे की शशी थरूर? फैसला १९ ऑक्टोबरला! बुलडाणा जिल्ह्यातून जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रेंसह २५ मतदार करणार मतदान;
वाचा जिल्ह्यातून कोण कोण करणार मतदान
८२ वर्षीय मल्लिकार्जुन खर्गे व ६६ वर्षीय शशी थरूर यांच्यात ही थेट लढत होणार असून १९ ऑक्टोबरला मतमोजणी होऊन काँग्रेसला नवा अध्यक्ष मिळणार आहे. दिल्लीतील काँग्रेस मुख्यालय आणि देशभरातील ६५ मतदान केंद्रावर ही निवडणूक होणार असून राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत देखील एका केंद्राची रचना करण्यात आली आहे. तब्बल २२ वर्षांनी ही निवडणूक होत आहे. याआधी २२ वर्षाआधी सोनिया गांधी आणि जितेंद्रप्रसाद यांच्यात ही लढत झाली होती, त्यात सोनिया गांधींचा विजय झाला होता.
बुलडाणा जिल्ह्यातून २५ मतदार करणार मतदान..
दरम्यान बुलडाणा जिल्ह्यातून या निवडणुकीत २५ मतदार मतदान करणार आहेत. प्रदेश काँग्रेस कमिटीने मान्यता दिल्यानुसार बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अधिकृत प्रदेश प्रतिनिधींना या निवडणुकीत मतदान करता येणार आहे. जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे, ॲड. संजय राठोड,ॲड.गणेशराव पाटील, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, मलकापूरचे माजी उपनगराध्यक्ष हाजी रशीद खाँ जमादार,डॉ.अरविंद कोलते,ॲड. ज्योतीराव अशोकराव ढाकणे, विजय अंभोरे, रिझवान सौदागर, सुधाकरराव धमक, मनोज कायंदे,
ॲड.जयश्रीताई शेळके,ॲड.अनंतराव वानखेडे, श्याम उमाळकर, सौ. मनिषाताई पवार, प्रकाश रामभाऊ अवचार, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, रामविजय बुरुंगले, आमदार राजेश एकडे, सौ. स्वातीताई वाकेकर, सौ. ज्योतीताई अशोकराव पडघान,महेश जाधव, लक्ष्मणराव घुमरे, ज्ञानेश्वर पाटील आणि हरीश रावळ हे निवडणुकीत मतदान करणार आहेत. मुंबईतील दादर येथील प्रदेश काँग्रेस कमिटीच्या टिळक भवन कार्यालयात सकाळी १० वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली असून ४ वाजेपर्यंत मतदानाची वेळ देण्यात आली आहे.