भारतीय कम्युनिस्ट पक्षही धिरज लिंगाडे यांच्या पाठीशी! १२ वर्षे बिनकामाच्या माणसाला दिली, ६ वर्षे कामाच्या माणसाला देण्याचे आवाहन

 
tiuty
अमरावती(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):विधानपरिषदेच्या अमरावती विभागीय मतदारसंघाची निवडणूक आता अवघ्या ५ दिवसांवर आली आहे. ३० जानेवारीला अमरावती विभागातील ५ जिल्ह्यात त्यासाठी मतदान होणार आहे.  निवडणूक जसजशी जवळ आली तसतशी त्यातील चुरस आणखी वाढत आहे . महाविकास आघाडीकडून धिरज लिंगाडे तर भाजपकडून १२ वर्षे आमदारकी भोगणारे रणजित पाटील रिंगणात आहेत. दरम्यान महाविकास आघाडीचे उमेदवार धिरज लिंगाडे यांना विविध पक्ष व संघटनांचा वाढता पाठिंबा रणजित पाटलांसाठी अडचणीचा ठरण्याची चिन्हे आहेत. आता लिंगाडे यांना भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा देखील पाठींबा जाहीर झाल्याने लिंगाडे यांची बाजू भक्कम झाली आहे. 

 आज,अमरावती येथे झालेल्या पदवीधरांच्या मेळाव्यात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय कौन्सिल सदस्य कॉ.तुकाराम भस्मे यांनी पाठिंब्याचे पत्र लिंगाडे यांना दिले. यावेळी बोलतांना भस्मे यांनी भाजपचे उमेदवार रणजित पाटील यांच्या १२ वर्षांच्या कारभारावर सडकून टीका केली. १२ वर्षे बिनकामाच्या माणसाला दिली,आता  ६ वर्षे कामाच्या माणसाला संधी द्या असे आवाहन यावेळी भस्मे यांनी केले. अमरावती विभागातील भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते, पदवीधर यांनी धिरज लिंगाडे यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन यावेळी भस्मे यांनी केले. पाठींबा दिल्याबद्दल लिंगाडे यांनी आभार मानत आपला विश्वास सार्थ ठरवेल असा शब्द पदवीधरांना दिला.