शहाजी बापू नंतर आ. रायमूलकर यांचा 'फोन संवाद' तुफान व्हायरल! म्हणाले ... अडिच वर्षात मुख्यमंत्री भेटले नाही , अपघात झाला तरी विचारपूस नाही; मग काय चकराच मारायच्या मुंबईला?

माझे मी पाहून घेईन , बंद कर मोबाईल म्हणत सैनिकाला दरडावले!!

 
बुलडाणा ( विशेष प्रतिनिधी:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शिवसेनेचे सांगोल्याचे बंडखोर आमदार शहाजी बापू यांचा गुवाहाटी चे खमंग वर्णन करणारा संवाद तुफानी व्हायरल झाला, गाजला! त्याची तीव्रता कमी होत नाही तोच मेहकरचे आमदार संजय रायमूलकर यांचा एका सैनिकासोबतचा मोबाईल संवाद व्हायरल होत असून राज्यभर गाजण्याची चिन्हे आहे...

बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या महाबंडात पहिल्या दिवसापासून सहभागी आ.रायमूलकर हे २१ च्या सकाळीच नॉट रीचेबल आल्यावर चर्चेत आले. यामुळे जिल्हा संपर्क प्रमुख खासदार प्रतापराव जाधव देखील अडचणीत आले. नंतर( बहुधा आसाम मध्ये पोहोचल्यावर)  त्यांचा मोबाईल पुन्हा सुरू झाल्यावर सिंदखेडराजा मतदारसंघातील कट्टर सैनिकाने त्यांच्याशी संपर्क करून थेट सवाल जवाब चा सामना रंगला! सैनिकाने नमस्कार करून थेट विषयाला हात घातला. नेमके आपल्या माणसाला मुख्यमंत्री पदापासून वंचित करायचं होतं का? अशी गुगली त्याने टाकली.

यावर आमदार काही बोलणार  तेवढ्यात त्याने तुम्ही बंड का केले असा दुसरा बाउन्सर टाकला. सुरुवातीला शांत राहणाऱ्या आमदारांनी , कामेच होत नव्हती म्हणून केलं असं सांगितलं. त्यामुळे पण न थांबता या सैनिकाने ' पण साहेब, भेट घेऊन हे सांगता आलं असतं की ? असा सवाल करीत आपल्या माणसाची (मुख्यमंत्री) बदनामी झाली ना असे विचारले. यावर किंचित चिडलेल्या आ.रायमूलकरांनी, अडिच वर्षात भेट नाही, माझ्या अपघाताच्या वेळी साधी विचारपूस नाही,  विकास निधी नाही, मग काय मेहकर ते मुंबई नुसत्या चकरा मारायच्या का? असा प्रति सवाल केला. 

खेडेकरांना विचार अन...शेवटी बंद कर फोन..

 यावर देखील शांत न बसणाऱ्या या हाडाच्या सैनिकाने प्रश्नांची सरबत्ती सुरूच ठेवली. साहेब, आता मग आमच्या सारख्या कार्यकर्त्याने काय करावे? असे विचारले असता आमदार रायमूलकर यांनी  ( माजी आमदार) खेडेकरांना विचार असे खडसावले. यावर या चिवट सैनिकाने ,पण साहेब आम्ही तुमचेच आहोत ना अशी मखलाशी करून उद्धव साहेब त्या देवेंद्र फडणवीस पेक्षा चांगले आहेत ना असे सांगितले असता , त्यांचा काय संबंध, खरे सीएम तर अजित पवार च आहे ना ?  असे उत्तर दिले.  तोपर्यंत आमदार चांगलेच चिडलेले असल्याचे संवादावरून स्पष्ट झाले. तरीही हा सैनिक स्टॉप घ्यायला  तयार नव्हताच ! त्याने पुन्हा सवाल टाकलाच! साहेब आता पुढची रणनीती काय असे विचारल्यावर भडकलेल्या आमदारांनी त्याला झापले. ते शिंदे साहेब ठरवतील, माझ्या मतदारसंघात चर्चा करून काय करायचे ते ठरवेल, तू फोन बंद कर आता असे खडसावून संगीतल्यावरच सैनिक आणि हा प्रेमळ , मजेदार, संवाद थांबला.  पण नंतर मात्र राज्यभर चक्री वादळाच्या वेगाने व्हायरल झालाय की...