सिंदखेडाजा तालुक्यात कोसळधार! शेडनेटचे नुकसान! शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी अधिकाऱ्यांना घेऊन आ. डॉ.राजेंद्र शिंगणे पोहचले बांधावर

 
ssss
सिंदखेडराजा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): पंधरवाड्यापासून दांडी मारलेल्या पावसाने काल सिंदखेडराजा तालुक्यातील अनेक गावांत अक्षरशः धुमाकूळ घातला. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी सुखावला असला तरी वादळी वाऱ्याने शेड नेट मध्ये पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या नुकसानीची तात्काळ दखल घेत कर्तव्यदक्ष आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी अधिकाऱ्यांना घेऊन नुकसान शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

सिंदखेडराजा तालुक्यातील नशिराबाद येथील ३० शेतकऱ्यांच्या आठ ते दहा एकरातील शेडनेटचे कालच्या वादळी वाऱ्यामुळे मोठे नुकसान झाले. शेडनेट फाटल्याने त्यातील पिकांचे सुद्धा नुकसान झाले तर काही ठिकाणी शेडनेटचे लोखंडे पाईप वाकले आहेत. या बाबतची माहिती मिळताच माजी मंत्री तथा सिंदखेडाजा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे अधिकाऱ्यांना घेऊन नशिराबाद येथे पोहचले.

शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन त्यांनी नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना धीर दिला. नुकसानीचे तातडीने पंचनामे करून अहवाल पाठविण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या. यावेळी तहसीलदार सुनील सावंत, तालुका कृषी अधिकारी वसंत राठोड, महसूल विभागाचे अधिकारी तलाठी, ग्रामसेवक यांची उपस्थिती होती.