चिखलीकरांनो सरकारी काम अडकून पडलेय? आता नो टेन्शन; १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत होईल सगळ्या कामांचा निपटारा! अधिकाऱ्यांच्या बैठकीत आ. श्वेताताईंचे निर्देश

 
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सरकारी काम अन् सहा महिने थांब अशी म्हण शासकीय कामांच्या बाबतीत प्रचलित असली तरी पुढच्या पंधरा दिवसांत नागरिकांचे प्रलंबित असलेली सगळी कामे काही क्षणात मार्गी लागणार आहेत.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस १७ ऑक्टोबर तर महात्मा गांधी यांची जयंती २ ऑक्टोबर हा कालावधी सेवा पंधरवडा म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या कालावधीत जनतेची कोणतीच कामे प्रलंबित राहू नयेत, त्यांच्या अडचणी तात्काळ सोडवाव्या , नागरिकांना सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवन्याची गरज पडू नये असे निर्देश चिखलीच्या आ. श्वेताताई महाले यांनी अधिकाऱ्यांना दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात त्यांनी चिखली विधानसभा मतदारसंघातील सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

सेवा पंधरवड्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना निधीचे वितरण करणे, पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तांत्रिक अडचणी मुळे लाभापासून वंचित शेतकऱ्यांना लाभ मिळवून देणे, प्रलंबित फेरफार नोंदीचा निपटारा, पात्र लाभार्थ्यांना शिधा पत्रिका वाटप, विवाह नोंदणी प्रमाणपत्र देणे, मालमत्ता हस्तांतरण नोंद, नवी नळ जोडणी, सामाजिक न्याय विभागाची कामे, महावितरण शी संबंधित सर्व कामे,  बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत  विहिरी करता अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांची नोंदणी करणे, दिव्यांग प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलियर प्रमाणपत्र, प्रकल्प ग्रस्तांना प्रमाणपत्र वाटप, भूसंपादन मोबदला देणे यासोबतच सरकारी कार्यालयातील सर्वच कामांचा निपटारा करण्याचे निर्देश आ. श्वेताताईंनी दिले. २ ऑक्टोबर नंतरही कामे प्रलंबित राहिली तर ती का राहिली याचा अहवाल संबधित अधिकाऱ्यांना शासनाला सादर करावा लागणार आहे.

या बैठकीला  निवासी  उपजिल्हाधिकारी दिनेश गीते, चिखलीचे तहसीलदार , बुलडाणा तालुक्याचे तहसीलदार, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी,चिखली व बुलडाणा पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी, चिखली व बुलडाणा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी,  चिखली व बुलडाणा तालुक्याचे कृषी अधिकारी, प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास विभाग, बुलडाणा व चिखलाचे तालुका भूमी अभिलेख अधिकारी, जिल्हा पशूवैद्यकीय अधिकारी यांच्यासह इतर विभागांचे अधिकारी उपस्थित होते.