भाजपामुळेच बदलला चिखलीचा चेहरामोहरा!; आमदार सौ. श्वेताताई महाले यांचे प्रतिपादन

 
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात चिखली शहरासाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळाला. कोट्यवधीच्या निधीतून चिखली शहरातील विविध भागांत कामे होऊन शहराचा चेहरामोहरा बदलला. भाजपाच्याच काळात चिखलीचा विकास झाल्याचे प्रतिपादन आमदार सौ. श्वेताताई महाले यांनी चिखली शहरातील सिंधी कॉलनीतील सिंधी समाज मंदिराच्या भूमिपूनप्रसंगी केले.

आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांच्या आमदार निधीतून १० लक्ष रुपये खर्चून सिंधी समाज मंदिराचे काम होत आहे. काल, ३ एप्रिलला त्‍याचे भूमिपूजन झाले. सिंधी समाजातील अमर शहीद हेमु कलानी यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. यानिमित्ताने सिंधी कॉलनी चौकाला अमर शहीद हेमू कलानी चौक हे नाव देऊन आमदार सौ. श्वेताताई महाले यांच्या हस्ते त्यांच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले.

या वेळी ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ, विश्वस्त विठ्ठल रुक्मिणी संस्थान, रामकृष्णदादा शेटे अध्यक्ष शिक्षण प्रसारक मंडळ, डॉ. प्रतापसिंग राजपूत जिल्हा उपाध्यक्ष भाजप, रामदासभाऊ देव्हडे ज्येष्ठ नेते, पंडित देशमुख शहराध्यक्ष भाजप, डॉ. कृष्णकुमार सपकाळ तालुकाध्यक्ष भाजप, शैलेश बाहेती नगरसेवक, प्रा. वीरेंद्र वानखेडे जिल्हा कार्यकािरणी सदस्य भाजप , अनमोल ढोरे पाटील तालुका उपाध्यक्ष भाजप, श्याम वाकदकर यांची प्रमुख उपस्थिती होती.  या वेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोहळ्याचे आयोजन नामू गुरूदासानी, सौ. अर्चना खबुतरे, अनुप महाजन यांनी केले होते. कार्यक्रमासाठी नामू गुरूदासानी, विनोद नागवाणी, हितेश गुरुदासानी व डॉ. भारती गुरुदासानी यांनी विशेष प्रयत्न केले.