दत्तात्रय लहाने यांच्या सन्मानयात्रेचा "बुलडाणा पॅटर्न" आता महाराष्ट्राभर गाजणार! राष्ट्रवादी काँग्रेस काढणार महापुरुषांची 'सन्मान यात्रा!' अजित पवारांची घोषणा..!

 
pawae
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): भाजपच्या वाचाळवीरांनी महापुरुषांच्या अपमान केल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय लहाने यांच्या संकल्पनेतून बुलडाणा तालुक्यात महापुरुषांच्या सन्मानार्थ १७ ते ३१ डिसेंबर दरम्यान काढण्यात आलेल्या सन्मान यात्रेला उस्फूर्त प्रतिसाद लाभला. दरम्यान आता हीच महापुरुषाची सन्मानयात्रेची संकल्पना संपूर्ण महाराष्ट्र राज्यात राबविण्यात येणार असल्याची घोषणा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात घेण्यात आलेल्या एका बैठकीत अजित पवारांनी हा निर्णय घेतला.

भाजपाच्या वाचाळवीरांनी थोर महापुरुषांचा शाब्दिक अवमान केला. मात्र महापुरुषांच्या कार्यकर्तुत्वाचा जागर व्हावा या दृष्टीने यात्रेचे संयोजक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे बुलडाणा तालुकाध्यक्ष दत्तात्रय लहाने यांच्या संकल्पनेतून 'सन्मान यात्रा' बुलडाणा तालुक्यात यशस्वीपणे काढण्यात आली. माजी मंत्री आ.डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या मार्गदर्शनात १७ डिसेंबरला शिरपूर येथून महापुरुषांच्या सन्मानार्थ यात्रेला सुरुवात झाली होती. तालुक्यातील प्रत्येक गावात यात्रेला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. विशेष करून महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सन्मानयात्रे दरम्यान माजी मंत्री डॉ. शिंगणे, जिल्हाध्यक्ष नाझेर काझी,दत्तात्रय लहाने यांचेसह पदाधिकारी व नागरिकांनी देखील महापुरुषांच्या विचारांचा उत्स्फूर्तपणे जागर केला.  

छत्रपती शिवराय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुलें,कर्मवीर भाऊराव पाटील या महापुरुषांचा अवमान करणाऱ्या राज्यपाल कोष्यारी,देवेंद्र फडणवीस, बावनकुळे, चंद्रकांत पाटील आदी भाजप नेत्यांबद्दल संताप व्यक्त करून निषेध जाहीर केला.या राष्ट्रवादीच्या 'सन्मान यात्रेचा' समारोप ३१ डिसेंबरला आ.अमोल मिटकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत देऊळघाट येथे करण्यात आला होता. मिटकरी यांच्या सभेला तुफान गर्दी उसळली होती. त्याचवेळी ही संकल्पना महाराष्ट्रभर राबविण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे आ. मिटकरी म्हणाले होते. दरम्यान महापुरुषांच्या समानार्थ काढण्यात आलेल्या सन्मानयात्रेचा  बुलडाणा पॅटर्न आता राष्ट्रवादी पक्षाकडून राज्यभरात राबविण्यात येणार आहे.