बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी खामगाव- जालना रेल्वेमार्गाबद्दल स्पष्ट सांगितलं! म्हणाले,चुकीच्या बातम्या पसरवून चांगल्या कामात खोडा घालू नका;

२२, २३,२४ ऑक्टोबरला भोकरदनला या, सगळ सांगतो म्हणाले.. 

 
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री ना. रावसाहेब दानवे यांचे सिल्लोड येथील एका सभेतील भाषण चांगलेच व्हायरल झाले होते. खामगाव जालना रेल्वेमार्गापेक्षा जालना जळगाव रेल्वेमार्ग कसा फायद्याचा हे दानवेंनी त्या भाषणातून पटवून दिले होते. त्यानंतर बुलडाणा जिल्ह्यातून ना.दानवेंच्या निषेधाचे सुर उमटत होते. दरम्यान काल, १९ ऑक्टोबरला संध्याकाळी खासदार प्रतापराव जाधव यांनीही पत्रकार परिषद घेऊन ना.दानवेंच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला गेल्याचे म्हटले होते. त्यानंतर रात्री उशिरा स्वतः रावसाहेब दानवे यांनी एक प्रसिध्दी पत्रक काढून खामगाव - जालना रेल्वेमार्गासंबंधीची भूमिका स्पष्ट केली आहे. खामगाव जालना रेल्वेमार्ग होणारच असल्याचे ना दानवेंनी म्हटले असून जालना जळगाव रेल्वेमार्ग हा वेगळा विषय असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

ना. रावसाहेब दानवे यांनी जारी केलेल्या पत्रकार नमूद केले आहे की, जालना ते खामगाव हा रेल्वे मार्ग १५५ किमीचा आहे. २००१-२००२  मध्ये या रेल्वे मार्गाचा प्राथमिक सर्वे झाला होता, त्यावेळी त्याची किंमत ३६९ कोटी होती आणि लागणारे पैसे आणि येणारे उत्पन्न यामध्ये २.०१% मायनस होते. त्यानंतर याच रेल्वे मार्गाचा पुन्हा प्राथमिक सर्वे २०११-१२ मध्ये झाला. यावेळी या किंमतीमध्ये वाढ होऊन त्याचा अंदाजे खर्च १०२७  कोटी रुपये निघाला, परंतु त्याही वेळेस लागणारा पैसा आणि मिळणारे उत्पन्न त्याला रेल्वेच्या भाषेत R-O-R म्हणतात. हे ४.२६% नी मायनस होते. त्यामुळे आर्थिक दृष्ट्या परवडणारा नसल्याने हा प्रकल्प मंजूर झाला नाही.

परंतु जालना देऊळगाव राजा, देऊळगाव मही, चिखली, खामगाव या भागातील जवळपास १३ गावातून जाणाऱ्या जनतेची मागणी लक्षात घेऊन २०१९ मध्ये मोदिजींचे सरकार आल्यानंतर मी पुन्हा केंद्रात मंत्री झालो आणि २०१९ ला पुन्हा एकदा सर्वे करण्याचा करण्यासाठी आदेशित करण्यात आले, परंतु कामाने जास्त गती घेतली नाही. जुलै २०२१ ला मी रेल्वे राज्यमंत्री पदाचा कारभार हाती घेतल्यानंतर मुंबईला या विषयावर विदर्भातील व मराठवाड्यातील आमदार, खासदारांची बैठक बोलावली. या विषयावर अधिकाऱ्यांच्या समक्ष चर्चा घडवून आणली. त्या बैठकीला खा. प्रतापराव जाधव, आ. श्वेताताई महाले, आ. आकाश फुंडकर, तत्कालीन पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे व अन्य लोकप्रतिनिधी उपस्थित होते असे ना. दानवेंनी  प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

या रेल्वे मार्गातील अडचणी काय आहेत? तो होण्यासाठी काय करावे लागेल?? यावर चर्चा झाली व ३० डिसेंबर २०२१ ला फायनल लोकेशन सर्व्हे करण्याकरिता ३ कोटी ८७ लाख रुपये मंजूर करण्यात आले. सर्व्हेचे काम प्रगतीपथावर आहे, "बोअर होल" घेऊन माती परीक्षण चे काम करण्यात येत आहे. संपूर्ण सर्वे झाल्यानंतर डिपीआर बनवल्या जाईल आणि त्यानंतर तो रेल्वे बोर्डाकडे येईल असेही ना. दानवे यांनी म्हटले आहे.

१९ऑक्टोबरला बुलडाणा जिल्ह्यातील काही वर्तमानपत्रात आणि सोशल मीडियावर बातम्या प्रसिद्ध झाल्या की, या मार्गाला खोडा घातला गेला.. हे संपूर्ण चुकीचे असून यावर कोणीही विश्वास ठेवू नये, सिल्लोड येथे गेलो असताना पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील उपस्थित होते. जो जालना ते जळगाव या नवीन रेल्वेमार्गाचा सर्व्हे होतोय, त्या सर्वेची आणि जालना खामगाव रेल्वे लाईनची तुलना करीत असताना “गुलाबराव जालना-जळगाव तुमच्या मतदारसंघातून जातो आणि माझ्या मतदारसंघातून १७४ पैकी १४० किमी जातो” असं म्हणणे आणि जालना-खामगाव रेल्वे मार्ग माझ्या मतदारसंघातून फक्त १२ किमी जातो..

या दोन्हीची तुलना करणे म्हणजे जालना-खामगाव रेल्वे लाईन होणार नाही, असा कोणी अर्थ काढू नये. मी स्वतः या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींशी चर्चा करीत असतो. अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करीत असतो. यासाठी आम्ही मागे जालन्यामध्ये आंदोलन केली, अनेक वेळा निवेदन घेऊन गेलो, हा रेल्वे मार्गात खोडा माझ्याकडून घातल्या जातो, असे म्हणणे योग्य नाही आणि कोणीही अशा बातम्या पसरवून चांगल्या कामात खोडा घालने योग्य नाही. असे मी सर्व जनतेला विनंती करतो. एक लोकप्रतिनिधी म्हणून काम व्हावं, असाच प्रयत्न कोणताही लोकप्रतिनिधींचा असतो. काम होऊ नये, असं कोणीही प्रयत्न करीत नसतो, हे मी आपणाला नम्रपणे सांगू इच्छितो. यासंदर्भात कोणाला जर प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घ्यायची असेल किंवा मी काही खुलासा करावा असे वाटत असेल तर आपण २२, २३, २४ आक्टोंबर २०२२ या दिवशी केव्हाही भोकरदनला येऊन माझ्याशी चर्चा करू शकता व संवाद साधु शकता. असेही या पत्रकाच्या शेवटी ना. रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे.