भाऊ तुम्हाला सूचना करण्याचा अधिकार दिला कुणी? काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रेंची ती फेसबुक पोस्ट चर्चेत

 
चिखली (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, माजी आमदार राहुल बोंद्रे यांना अजूनही ते स्वतः आमदार आहेत असे वाटते की काय असा प्रश्न पडावा, असा प्रकार आज, १२ मार्चला समोर आला आहे. बोंद्रे यांनी जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांची भेट घेतली. सैलानी यात्रेवरील निर्बंध शिथिल करावेत, अशी मागणी त्यांना करायची होती. मात्र मागणी अथवा विनंती न करता सूचना केल्याचे त्‍यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्‍हटले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना अशी सूचना करण्याचा अधिकार लोकप्रतिनिधींना असतो, पण बोंद्रे सध्या लोकप्रतिनिधी नाहीत. तरीही त्‍यांनी सूचना केल्याने भाऊ तुम्हाला जिल्हाधिकाऱ्यांना सूचना करण्याचा अधिकार दिला तरी कुणी? अशी कुजबूज चिखलीत सुरू झाली आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राहुल बोंद्रे यांचा पराभव झाला असला तरी काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद त्यांच्याकडे असल्याने कार्यकर्त्यांना आदेश देणे आणि सूचना करण्याचे काम ते करत असतात. मात्र शासकीय अधिकाऱ्यांना भेटतानासुद्धा त्यांना ते अजूनही आमदार असल्याच्या थाटात भेटत असल्याचे आजच्या प्रकारावरून समोर आले. चिखली तालुक्यातील सैलानी येथील यात्रा देशभरात प्रसिद्ध आहे. मात्र कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून यात्रा होऊ शकली नाही.

लसीकरणात जिल्हा मागे असल्याने यंदासुद्धा यात्रा होणार नसल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. कोरोनामुळे प्रतिबंध असले तरी परंपरा आणि धार्मिक कार्य कायमस्वरुपी बंद करू नये आणि मर्यादित उपस्थितीत धार्मिक कार्यक्रमाला परवानगी द्यावी, अशी मागणी राहुल बोंद्रे आणि शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना केली.

अर्थात या मागणीत गैर काहीही नव्हते. याआधी दोन्ही वर्षी मर्यादित संख्येत धार्मिक कार्यक्रमाला परवानगी देण्यात आली होती. मात्र जिल्ह्याचे जिल्हा दंडाधिकारी असलेल्या व्यक्तीला आपण मागणी करायची असते हा सामान्य सभ्यतेचा नियम सुद्धा बोंद्रेंना कळला नाही. अर्थात बंद दरवाजाआड झालेल्या चर्चेत त्यांनी मागणीच केली असेल मात्र आपण केले हे सांगण्यासाठी लगेच फेसबुकवर पोस्ट करून जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्याचे त्यांनी सांगून टाकले. त्यामुळे भाऊ, जिल्हाधिकाऱ्यांना सूचना करण्याचा अधिकार तुम्हाला दिला कुणी, अशी चर्चा सुरू झाली आहे.