Breaking! जिल्हाधिकारी दिल्ली दरबारी, नगरपालिका प्रभागावरील सुनावण्या आता "या" तारखेला...

 
बुलडाणा ( विशेष प्रतिनिधी: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती यांना साक्षीसाठी राजधानी दिल्ली येथे जावे लागल्याने  जिल्ह्यातील ८ नगरपालिकांच्या प्रारूप प्रभाग रचनांवरील सुनावण्या आता लांबणीवर पडल्या आहे!  आता थेट २३  मे रोजी पालिकांच्या प्रभाग रचनेवरील सुनावण्या घेण्यात येणार आहे. 

बुलडाणा  जिल्ह्यातील ९ नगरपालिकांच्या मुदत जानेवारी मधेच संपल्या असून आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचना कार्यक्रम नव्याने हाती घेतला आहे. चिखली पालिकेची हद्दवाढ झाल्याने नव्याने प्रभाग रचना करावी लागणार आहे. त्यामुळे चिखली वगळून अन्य ८ पालिकांच्या प्रभाग रचनावर मागील १० ते १४  मे दरम्यान नागरिकांच्या हरकती, सूचना मागविण्यात आल्या होत्या . बुलडाणा,  मलकापूर मध्ये सर्वाधिक म्हणजे प्रत्येकी ११ ( एकूण २२ ) हरकती प्राप्त झाल्या. मेहकर, देऊळगाव राजा व खामगाव मध्ये प्रत्येकी ४ मिळून १२, शेगाव मध्ये ५ तर जळगाव जामोद मध्ये केवळ एकच हरकत प्राप्त झाली.  नांदुरा मध्ये एकही हरकत प्राप्त झाली नाहीये!
 
आता  एकाच दिवशी सुनावणी
 
दरम्यान यापूर्वी घोषित
कार्यक्रमानुसार  बुलडाणा, देऊळगाव राजा, मेहकर आणि मलकापूर मधील हरकतींवर १८ मे तर  शेगाव, जळगाव जामोद, खामगाव मधील हरकतीवर १९ तारखेला सुनावणी होणार होती. मात्र  जिल्हाधिकारी उपलब्ध नसल्याने आता थेट २३ तारखेला सर्व पालिकांची सुनावणी होणार असल्याचे जिल्हाधिकारी  कार्यालयातील सूत्रांनी सांगितले.