वारे बहाद्दर सचिव ! सरपंचांना म्हणतो ' खाणे' तर आपला अधिकारच; त्यासाठीच इथं बसलो; म्हणाला मतदार चोरच!! पहा व्हायरल व्हिडीओ..

 
मेहकर ( अनिल मंजुळकर:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यातील मोठ्या ग्रामपंचायतपैकी असलेल्या डोणगाव( ता. मेहकर) च्या ग्रामविकास अधिकारी आणि महिला सरपंच यामधील भ्रष्टाचाराचे खुले समर्थन करणारा व्हिडीओ सध्या समाज माध्यमांवर 'व्हायरल' होत असून यामुळे नगरीत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. हे प्रकरण पोलिसांपर्यंत जाण्याची दाट शक्यता दिसून येत आहे.

ग्राम पंचायत कार्यालयात अलीकडेच झालेल्या एका चर्चेत ग्रामविकास अधिकारी ज्ञानेश्वर चनखोरे , नवनिर्वाचित महिला सरपंच रेखा पांडव व इतर पदाधिकाऱ्यांना कामे आणि पैसे खाणे यांचे डोस पाजत असल्याचे दिसून येते. कामे आणि  'व्यवहार'वर विषय निघाला असता या बहाद्दराने 'आपण इथं  खाण्यासाठीच बसलो असून खाणे हा आपल्याला मिळालेला हक्कच आहे' असा 'रोख' ठोक सल्ला दिला .  

आपल्या नावाप्रमाणे 'ज्ञान ' पाजताना हे महाशय पुढे म्हणाले की 'जनतेचा बाऊ करू नका,  तुम्ही कसेबी वागले तरी वाईटच राहता, तुम्ही रोडवर सोन्याचे पत्रे बी लावले तरी हे त्यातबी खोट काढतील. यांनीच कुठे फुकटात मतदान केले ? ते चोरच आहे' असे  जहाल वक्तव्य त्यांनी या 'व्हिडीओ' मध्ये केल्याचे दिसून येते. या चर्चेला रवी पांडव, कर्मचारी परमाळे, घोगल देखील हजर असल्याचे दिसून येते. 

सरपंच, सचिवाला बदनाम करण्याचा विरोधी गटाचा डाव..

दरम्यान ही डॉयलॉग बाजी सोशल मीडियावर  प्रसारित झाल्याने डोणगाव मध्ये खळबळ उडाली. चनखोरे यांनी हा 'व्हिडीओ' बनावट असल्याचा दावा केला. महिला सरपंच आणि सचिवाला बदनाम करण्याचा हा विरोधी गटाच्या सदस्यांचा डाव असल्याचा आरोप त्यानी केला. संबंधितावर कारवाई करण्यासाठी आपण पाऊले उचलणार असेही ते म्हणाले. उपसरपंच इंगळे, सदस्य आखाडे यांनी ही बाब  लाजिरवाणी असल्याचे सांगितले. आखाडे यांनी  सचिवाला कारणे दाखवा नोटीस बजावणार असल्याचे सांगून नियमानुसार  कार्यवाही होणार असे सांगितले.