धनुष्यबाण शिंदेगटालाच मिळणार! खा. जाधव यांनी केला दावा; उद्धव ठाकरे होते नामधारी सीएम. आदित्य ठाकरे अन् राऊत यांच्यावरही डागली टीकेची तोफ..!

 


बुलडाणा ( विशेष प्रतिनिधी:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मेहकर येथे काल, रविवारी आयोजित युवासेना पदाधिकारी  मेळावा खा. प्रतापराव जाधव यांच्या जहाल, आक्रमक भाषणाने  चांगलाच गाजला! एखादा तिशीतील युवा देखील लाजेल अश्या जोशात उठावाची कारणमीमांसा करताना त्यांनी आदित्य ठाकरे, संजय राऊतच  काय शिवसेना पक्ष प्रमुख यांनाही सोडले नाही.  उद्धव ठाकरे केवळ नामधारी मुख्यमंत्री होते असा हल्ला लढविताना त्यांनी 'युवराज 'आणि प्रवक्ते यांच्यावर तुफान शाब्दिक हल्ला  चढविला. याचबरोबर  आत्ताच आमदार झाल्याच्या अविर्भावात मिरवणाऱ्या नेत्यापासून  युवकांनी सावध राहण्याचा सल्ला देत त्यांनी कुणाचाही नामोल्लेख न करता शेंदलेकरांना टोला लगावला.

युवा नेते ऋषी जाधव व नीरज रायमूलकर यांनी मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी आमदार संजय रायमूलकर यांच्यासह पदाधिकारी, , युवासेनेचे कार्यकर्ते बहुसंख्येने हजर होते.  या  हाऊस फुल्ल मेळाव्यात बंडाची पार्श्वभूमी विशद करताना खा. जाधब यांनी,  आम्ही शिवसेना  वाचवण्यासाठीच उठाव केला आहे. येणाऱ्या काळात शिवसेना म्हणून आमच्या गटाला मान्यता मिळेल व संख्याबळावर धनुष्यबाण हे चिन्ह आम्हालाच  मिळेल, असा  खणखणीत दावा त्यांनी बोलून दाखविला. आमचीच शिवसेना खरी असल्याचा दावाही त्यांनी केला.

ते नावाचेच, राष्ट्रवादीनेच राज्य केलं

  उद्धव ठाकरे हे नावानेच मुख्यमंत्री होते, खरे सरकार तर राष्टवादी काँग्रेस च चालवीत होती असा घणाघात त्यांनी केला.  मातोश्रीच्या याच पक्षाचे  आत बसलेले तर बाहेर वेटिंग वर असलेले सेना आमदार हे नेहमीचेच झाले. लोणार विकासासाठी आदित्य ठाकरे यांच्याकडे गेलो तर ते ओळखायला अन बोलायला तयार नाही अशी आमदारांची गत होती. एक दिवसही मंत्रालयात न बसणारा मंत्री म्हणजे आदित्य ठाकरे अश्या शब्दात त्यांनी ज्युनिअर ठाकरेंची खिल्ली उडविली . संजय राऊत यांच्यावर प्रहार करताना ते आमच्या भरवश्यावर मोठे आणि मतांमुळे खासदार झाले  त्यांनी अगोदर राजीनामा द्यावा अन  मगच आमच्यावर टीका करावी असे आवाहन त्यांनी केले. शिवसेना नेते संजय राऊत हे आमच्या मतांवर निवडून आले आहेत. त्यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन मगच आमच्यावर बोलावं, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला

मेहकर किती वर्षे राखीव याचे भान ठेवुन मिरवा...

  यावेळी  त्यांनी  मोठ्या नेत्या बरोबरच स्थानिक नेत्यांनाही पट्ट्यात  घेतले.  आत्ताच आमदारकीच्या थाटात मिरविणाऱ्यानी  मेहकर मतदार संघ साडेबारा वर्षे   राखीव आहे, याचे भान   ठेवावं. भावी आमदार म्हणून  मिरवणाऱ्यांचा  भ्रमनिरास अटळ असल्याचा टोला त्यांनी लगावला.
फुस लावणारी मंडळी तालुक्यामध्ये सक्रिय  झाली असून युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी सतर्क राहण्याची गरज आहे असेही खासदार जाधव म्हणाले.