मोठी बातमी..! तोडाफोडी सुरूच; उद्घव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख कपिल खेडेकरांचे स्कॉर्पिओ वाहन फोडले; शिवसेनेचा लोगोही तोडला; तोंडावर स्कार्फ बांधून आलेल्या.....
शिवसेना दोन गटांत विभागल्यानंतर जिल्ह्यात दोन्ही गटात राडा झाल्याच्या काही घटना घडल्यात. बुलडाण्यात नरेंद्र खेडेकर, जालिंधर बुधवंत, छगन मेहत्रे यांना एका कार्यक्रमात धक्काबुक्की झाली होती. धक्काबुक्की केल्याचा आरोप आमदार संजय गायकवाडांचे पुत्र कुणाल गायकवाड यांच्यावर होता. चिखलीत खा. प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसाचे पोस्टर फाडण्यात आल्याची घटना घडली होती.
मोताळा तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा राजूर घाटात मारहाण झाली होती. दरम्यान आज चिखलीत कपिल खेडेकर यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या स्कॉर्पिओ वाहनाची तोडफोड करण्यात आली. गाडीवरील शिवसेनेचा लोगो तोडण्यात आला. सकाळी घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. सीसीटिव्ही फुटेज मध्ये एका गाऊन घातलेल्या व तोंडावर स्कार्फ बांधून आलेल्या महिलेने एका फरशीच्या तुकड्याने गाडी फोडल्याचे दिसत आहे. रात्री १२ वाजून ४ मिनिटांनी ही घटना घडल्याचे सिसी टिव्ही फुटेज वरून समोर आले आहे. वाहन फोडणारी महिला कोण? याबद्दलची माहिती अद्याप समोर आली नाही. महिलेला समोर करून कुणीतरी हा कारनामा केला का? अशीही चर्चा सध्या सुरू आहे. दरम्यान या प्रकारामुळे शिवसैनिक संतप्त झाले असून जशास तसे उत्तर देण्याची भाषा बोलल्या जात आहे.