मोठी बातमी! मनसे नेते संदीप देशपांडेसह हजारो मनसैनिक शेगावात दाखल! भारत जोडो यात्रेत राडा होण्याची शक्यता; राहुल गांधींनी सावरकरांबद्दल केलेल्या विधानावरून मनसे आक्रमक..
Nov 18, 2022, 08:28 IST
शेगाव ( ज्ञानेश्वर ताकोते: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बद्दल राहुल गांधींनी केलेल्या विधानामुळे हिंदुत्ववादी संघटना चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मनसैनिकांना शेगावात दाखल होण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार आज, १८ नोव्हेंबरच्या पहाटेपासून मनसेचे नेते, कार्यकर्ते शेगावात दाखल होत आहेत. मनसे राहुल गांधींना काळे झेंडे दाखवणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे भारत जोडो यात्रेत राडा होण्याची शक्यता आहे.
खा. राहुल गांधी आज शेगाव येथील सभेला संबोधित करणार आहेत. या सभेला जवळपास ५० हजार लोक जमण्याची शक्यता आहे. त्यासाठीची सगळी तयारी झाली आहे. दरम्यान या यात्रेत राहुल गांधींनी सावरकरांबद्दल केलेल्या विधानावरून मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे आज पहाटेच शेगावात दाखल झाले. त्यामुळे मनसे आणि काँग्रेस आमने सामने येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या शेगाव शहराला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे.