मोठी बातमी! मातोश्रीशी निष्ठावान सरदार व मावळ्यांची आज बुलडाण्यात बैठक!! बंडखोरी नंतरच्या स्थितीचा घेणार आढावा

 
बुलडाणा( संजय मोहिते:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  शिवसेनेतील महा बंडाच्या वादळामुळे उडालेला धुराळा आता खाली बसायला लागला असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषेत सांगायचे झाल्यास, आता पाला पाचोळा उडून गेलाय! सेनेचा गड असलेल्या बुलडाणा जिल्ह्याचे चित्र काही वेगळे नसून सेनापती अन 2 सरदार  शिंदे गटात सामील झाले असले तरी बहुतेक पदाधिकारी व हजारो सर्वसामान्य निष्ठावान शिवसैनिक सेनेसोबतच राहिले आहे. यामुळे ठाकरे सेना व शिंदे सेना या 2 गटांची पोझिशन अन चित्र हळूहळू स्पष्ट होत आहे...

या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील निष्ठावान पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक आज गुरुवारच्या मुहूर्तावर आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला घाटावरील व घाटाखालील प्रमुख पदाधिकारी हजर राहणार असल्याचे वृत्त आहे. यामध्ये सह संपर्क प्रमुख, जिल्हा प्रमुख, उप जिल्हा प्रमुख, तालुका, शहर व शाखा प्रमुखांचा समावेश असल्याचे निष्ठावान गटाच्या जवाबदार सूत्राने सांगितले.

या बैठकीचा  हमखास 'स्पॉट '  कळाला नसला तरी ती घाटाखाली होण्याची दाट शक्यता आहे. आज संध्याकाळी  चार साडेचार वाजताच्या आसपास आयोजित या बैठकीत बंडा नंतरची संघटनात्मक स्थिती, कोण आले व कोण गेले, कोण जाऊ शकते व येऊ शकते (का?) याचा आढावा घेण्यात येणार असल्याचे समजते. तसेच जिल्ह्याला मिळू शकणाऱ्या( संभाव्य) लाल दिव्या नंतर आणखी काही पडझड होऊ शकते यावर देखील चिंतन मनन होऊ शकते.