मोठी बातमी! जिल्ह्यात बेपत्ता होण्याचे सत्र सुरूच; जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील बेपत्ता; बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात तक्रार

 
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता होणाऱ्यांची संख्या वाढली आहे. जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात लग्नाळू मुले, मुली बेपत्ता होण्याच्या तक्रारी दाखल होण्याचे प्रमाण वाढले असतानाच आता चक्क जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यात आली आहे. अर्थात ही  प्रतीकात्मक तक्रार असून पालकमंत्री झाल्यापासून केवळ एकदाच जिल्ह्यात येऊन गेलेले गुलाबराव पाटील अतिवृष्टीने संकटात सापडलेला जिल्ह्यातला शेतकरी धाय मोकलून रडत असताना सुद्धा जिल्ह्यात आले नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बुलडाणा शहर शाखेच्या वतीने ही तक्रार देऊन आगळ्या वेगळ्या पद्धतीने पालकमंत्र्यांचा निषेध करण्यात आलाय.

अतीवृष्टीने जिल्ह्यातला शेतकरी संकटात सापडला आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकऱ्याचे दिवाळे निघाले आहे. मात्र असे असले तरी शेतकऱ्यांनी तक्रार करावी तरी कुणाकडे असा प्रश्न उपस्थित झाला आहे, कारण जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील एकदाच जिल्ह्यात येऊन गेले, त्यानंतर ते परत जिल्ह्यात फिरकलेच नाहीत. त्यांचा शोध घेतला असता अधूनमधून ते टिव्हीवरच दिसतात, प्रत्यक्षात मात्र सापडत नसल्याने त्यांचा शोध घेऊन त्यांना बुलडाणा जिल्ह्यात आणावे अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.

राज्यात शिंदे फडणवीस सरकार येऊन १०० च्या वर दिवस उलटले आहेत. या शंभर दिवसात १०० पेक्षा अधिक निर्णय कागदोपत्री झाले असले तरी एकही निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही. विरोधी पक्षाच्या दबावानंतर राज्यात पालकमंत्री नियुक्त केले असले तरी त्यांना निर्णय घेण्याचे अधिकार नसल्याने ते चकव्यासारखे सैरावैरा पळत आहेत.  बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री भूमिगत झाल्यागत आहेत. जिल्ह्यातील विकास काम सध्या सुरू नाही.

गोरगरिबांसाठी असलेल्या योजना सरकार दरबारी बंद आहेत.जिल्हा नियोजन समितीच्या बैठका होत नसल्याने न्याय कुणाकडे मागावा असा प्रश्न पडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री बुलडाणा जिल्ह्यात येण्याचा रस्ताच विसरले की काय यावर संशोधन करून पालकमंत्र्यांचा शोध घेत त्यांना बुलडाणा जिल्ह्यात आणावे अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बुलडाणा शहर अध्यक्ष  अनिल बावस्कर यांच्या नेतृत्वात ही तक्रार देण्यात आली.