मोठी बातमी..!२६ नोव्हेंबरला उद्धव ठाकरे जिल्ह्यात! चिखलीला होणार भव्य शेतकरी मेळावा

 
चिखली( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे २६ नोव्हेंबर रोजी बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. काल, ३१ ऑक्टोबरला मुंबईतील मातोश्री बंगल्यावर जिल्ह्यातील शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीतच उद्धव ठाकरे चिखली येथे येणार असल्याचे निश्चित झाले.

जिल्ह्यातील १ खासदार आणि २ आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्यानंतरही नरेंद्र खेडेकर, जालिंधर बुधवंत, आशिष रहाटे, वसंतराव भोजने या शिवसैनिकांनी जास्त पडझड होऊ दिली नाही. याआधी बुलडाणा येथे झालेला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा मेळावा चांगलाच गाजला होता. आता ७ नोव्हेंबरला आदित्य ठाकरे बुलडाणा आणि मेहकर येथे होणाऱ्या जाहीर सभांना संबोधित करणार आहेत. त्यानंतर २६ नोव्हेंबरला चिखली येथील तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर उद्धव ठाकरे भव्य शेतकरी मेळाव्याला संबोधित करणार असल्याची माहिती जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर यांनी "बुलडाणा लाइव्ह" शी बोलतांना दिली.