बिग ब्रेकिंग! तयारी चालणार एप्रिल मध्यापर्यंत; मेमध्यावर निवडणुका!! तळपत्या उन्हाळ्यात रंगणार जिल्हा परिषदेचा रणसंग्राम

 
बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः आगामी विधानसभा निवडणुकांची रंगीत तालीम ठरणाऱ्या जिल्हा परिषदेच्या रणसंग्रामाचे पडघम मंद आवाजात का होईना वाजायला लागले असल्याने निवडणूक कधी? हा प्रश्न राजकीय वर्तुळाच्या ऐरणीवर आलाय! मात्र सध्याची गती लक्षात घेतली प्रशासकीय तयारीला एप्रिल मध्य उजाडेल अन्‌ परिणामी निवडणुका मे मध्याच्या आसपास होईल, असा राजकीय व निवडणूक अभ्यासकांसह उच्चस्तरीय प्रशासकीय वर्तुळाचा अंदाज आहे.


बुलडाण्यासह राज्यातील 25 जिल्हा परिषदांच्या प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे काम आता आटोपत आले आहे. उत्तर दिशेकडून सुरुवात करून पूर्व नंतर पश्चिम अन्‌ मग दक्षिण दिशा असे म्हणजे झिकझॅक पद्धतीने जि.प. मतदार गटांची रचना करण्यात आली आहे. त्यापूर्वी ग्रामविकास मंत्रालयाने वाढीव लोकसंख्येच्या प्रमाणात मतदार गट व पंचायत समिती गण वाढविण्यास मंजुरी दिली. यामुळे तहसीलमधील निवडणूक कक्षांना अगोदर मागील जुने गट व नंतर वाढीव गट संख्या अशा 2 नमुन्यांत रचना करून नकाशे तयार करावे लागले. आता वाढीव संख्येनुसार गट व नकाशे करणे क्रमप्राप्त ठरले.

विविध नमुन्यांची कसरत अन मान्यता, हरकतींची मालिका...
दरम्यान, आता 8 ते 14 फेब्रुवारी दरम्यान कच्च्या रचनेची तपासणी राज्य निवडणूक आयोगाच्या मुंबईस्थित कार्यालयात होणार आहे. मात्र ही व यानंतरची  कार्यवाही सोपी नसून गुंतागुंतीची व दीर्घकाळ चालणारी आहे, हे विशेष. राजधानीमधील वरिष्ठ सूत्रांनी बुलडाणा लाइव्हला दिलेल्या माहितीनुसार तहसील कार्यालयांना (वाढीव संख्यातील) मतदार गटांची रचना व नकाशे 3 ते 4 नमुन्यांत तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

आयोगाच्या चमू या सर्व प्रारूप रचना व नकाशांची काटेकोर तपासणी व पडताळणी करून कोणता नमुना योग्य हे ठरवेल. त्या नमुन्यात काय सुधारणा करायची याचे निर्देश देणार आहे. त्यानुसार सुधारित प्रारूप प्रभाग फेररचना तयार करण्याचे काम फेब्रुवारी एंडपर्यंत होईल, असा अंदाज आहे. या सोपस्कारानंतर  साधारणतः मार्च मध्यावर विभागीय आयुक्तांनी या रचनेला मान्यता दिल्यावर तो प्रसिद्ध करून हरकती व सूचना मागविण्यात येतील. या हरकतीवर जिल्हाधिकारी सुनावणी घेतील. या सुनावणीत समाधान न झालेल्यांना विभागीय आयुक्तांकडे अपील करण्याचे प्रावधान आहे. तेथील कारवाईनंतर मतदारसंघ रचना अंतिम होईल. ही प्रक्रिया एप्रिल मध्यावर पूर्ण होईल, अशी शक्यता या सूत्रांनी बोलून दाखविली. परिणामी निवडणुका मे मध्यावर लागतील, असा आजचा रागरंग आहे.