बिग ब्रेकिंग! जिल्हा परिषद प्रभाग रचनावर आयुक्तांकडे सुनावणी !! स्थळ अंबा नगरी; मुहूर्त शुक्रवारचा

 
 बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा जिल्हापरिषदेच्या ६८ मतदारसंघाच्या प्रारूप प्रभाग रचनावर अंतिम मुदतीत  जिल्हाधिकाऱ्यांकडे मोठ्या संख्येने आक्षेपवजा हरकती घेण्यात आल्या. या हरकतींवर विभागीय आयुक्तांकडे उद्या शुक्रवारी सुनावण्या घेण्यात येणार असून याकडे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे प्रामुख्याने ग्रामीण नेत्यांचे लक्ष लागले  आहे. 

जिल्हा परिषदेच्या ६८ गट तर १३ पंचायत समित्यांच्या गणाच्या प्रारूप प्रभाग रचना २ जून रोजी प्रसिद्ध करण्यात येऊन त्यावर हरकती मागविण्यात आल्या. ८ जून या अंतिम मुदतीत तब्बल ५७ हरकतींचा जिल्हाधिकारी यांच्याकडे खच पडला!

दरम्यान या ५७ हरकतींवर प्रभारी  विभागीय आयुक्त  सुनावणी घेणार आहे. २२ जूनपर्यंत जीप गट व पंस गण अंतिम होणार आहे. २७ जून पर्यंत  हे मतदारसंघ शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्याचे नियोजन आहे. यामुळे हरकती घेणाऱ्या गाव पुढाऱ्यासह शेकडो भावी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांसह हजारो कार्यकर्त्यांचे या सुनावणी कडे लक्ष लागले आहे. किती हरकती स्वीकारल्या जातात, किती फेटाळण्यात येतात हा व्यापक राजकीय उत्सुकतेचा विषय ठरला आहे.