राहुल गांधीं शेगावात येण्याआधी वातावरण पेटले; सावरकरांबद्दल केलेल्या विधानामुळे मनसे संतप्त! राज्यभरातील मनसैनिक शेगावात राहुल गांधींच्या यात्रेत करणार राडा?

मनसेचे तालुकाध्यक्ष म्हणाले "लाज वाटली पाहिजेत.."

 
शेगाव( ज्ञानेश्वर ताकोते: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खा. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा उद्या १८ नोव्हेंबरला शेगावात येत आहे. उद्या एका जाहीर सभेला देखील खा. राहुल गांधी संबोधित करणार आहेत. मात्र राहुल गांधी जिल्ह्यात येण्याआधीच आता वादाची ठिणगी पेटली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांवर राहुल गांधीनी केलेल्या टीकेचे पडसाद राज्यभर उमटत असून महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रचंड आक्रमक झाली आहे. उद्या शेगावात मनसैनिक राहुल गांधींना काळे झेंडे दाखवणार असल्याचे वृत्त आहे. तसे आदेश राजेश ठाकरेंनी मनसैनिकांनी दिल्याचे मनसेच्या तालुकाध्यक्षांनी सांगितले आहे.

राहुल गांधींच्या वक्तव्याने हिंदुत्ववादी संघटना देखील प्रचंड आक्रमक झाल्या आहेत. दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना राहुल गांधींच्या विधानाचा विरोध करण्याचे फर्मान सोडले आहे. राजसाहेबांचा आदेश आमच्यासाठी अंतिम असतो, राज्यभरातील मनसैनिक उद्या शेगावात जमून मनसे स्टाईल "त्या" विधानाचा निषेध करणार आहेत. राहुल गांधींना स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल तसे विधान करायला लाज वाटायला पाहिजेत अशी संतप्त प्रतिक्रिया मनसेच्या तालुकाध्यक्षांनी दिली आहे. दरम्यान मनसेच्या या रुद्रावतारामुळे पोलिसांची डोकेदुखी मात्र चांगलीच वाढण्याची चिन्हे आहेत.