BULDANA LIVE SPECIAL: शंभू तर नाय पावला ! आता बाप्पाला कौल लावला !! 'लाल मोदक' कुणाला मिळणार? ' भक्त आतुरले

 
mahale

बुलडाणा( संजय मोहिते:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चाळीसेक  दिवसानंतर अखेर पवित्र श्रावण महिन्यात पार पडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात जिल्ह्यातील ५ शिलेदारासह लाखो समर्थक, कार्यकर्ते यांची घोर निराशा झाली.  भोळा साम्ब असलेला महादेव न पावल्याने आता ५ आमदारांना गणपती बाप्पा तरी पावतो काय  व त्यापैकी एखाद्याला तरी लाल दिव्यारूपी कौल देतो का ? याकडे ' भक्तां' चे लक्ष लागले आहे.

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या जोडीने पहिल्या विस्तारात जिल्हाच काय पश्चिम  विदर्भाकडेच साफ दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. भाजपा अन शिंदे गटात मंत्री पदासाठी टोकाची चुरस असल्याचे दिसून आले. प्रामुख्याने शिंदे गटात तर उघड नाराजी पर्यंत ही चढाओढ दिसून आली. यामुळे तडजोड,  मनधरणी करता करता नाकीनऊ आलेल्या या नेत्यांनी मग मराठवाडा, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र वर मेहरबानी करताना एरवीही उपेक्षित विदर्भ अन त्यातही पश्चिम विदर्भाकडे कानाडोळा केला. आता श्रावणामुळे सर्वत्र महादेवाचा गजर होत असून भोळा साम्ब लगेच प्रसन्न होतो अशी श्रद्धा आहे. बरं महादेव तर सोडाच पण 'एकनाथ' आणि 'देवेंद्र' हे लोकशाहीतील देव सुद्धा ५ सरदारांना पावले नाही!
 
अंधेरा कायम...!

यामुळे  पहिल्या यादीत  नाव नक्की  अशी खात्री असलेल्या संजय कुटे यांनाही शपथ घेण्याची संधी मिळाली नाही! शिंदेंचे चहेते संजय रायमूलकर यांचेही भाग्य उजळले नाही. आपल्या दुनियेत( खामगाव मतदारसंघात)च मश्गुल आणि खुश असलेल्या आकाश  फुंडकरांना संधी नव्हतीच पण समर्थकांना लॉटरीची अंधुक आशा होती. पण राजकारणात ( भाजपात तर अजिबातच) असे होत नाही.

संजय गायकवाड बुलडाण्यात परतल्यावर रखडलेल्या विकासकामाना मार्गी लावण्यात मग्न राहिले. मेहकर नाही तर बुलडाण्याच्या 'संजय' ची वर्णी लागेल ही आशा फोल ठरली. मंत्रिमंडळ शत प्रतिशत पुरुष प्रधान असल्याची टीका झाल्याने चिखलीकर श्वेता महाले यांची निराशा कमी झाली. सप्टेंबरमध्ये होणाऱ्या दुसऱ्या विस्तारात त्यांना बहुजन समाज, विदर्भ- मराठवाड्यात एकही महिला आमदार नसणे आणि आक्रमकता हे ३ निकष कामी येतात काय? हा उत्सुकतेचा प्रश्न आहे. आता महादेव तर पावला नाही पण ३१ ऑगस्टला आगमन करणारा आणि सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात निर्बंधमुक्त फुल्ल जोशात मुक्कामी असणारा गणपती बाप्पा कुणाला( तरी) पावतो काय याकडे भक्तांचे लक्ष लागले आहे...