BULDANA LIVE SPECIAL बंडखोरीचा एक मुद्दा होता घराणेशाही! शिंदे गटात घराणेशाही नाही का? नजर टाकुया शिंदे गटातील जिल्ह्यातल्या घराणेशाहीवर! पुत्रमोह जिल्ह्यातल्या "या" नेत्यांनाही झालाय

 
jadhav
बुलडाणा( कृष्णा सपकाळ: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): यंदाचा जून महिना महाराष्ट्रासाठी धक्कादायक ठरला. शिवसेनेच्या तब्बल ४० आमदारांनी बंडखोरी करून एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली वेगळा गट स्थापन केला . त्यानंतर जुलै महिन्यात १२ खासदारांनी आपापल्या सोयीचे राजकारण लक्षात घेऊन शिंदेगटाची वाट धरली. हा सगळा उठाव हिंदुत्वासाठी आहे असे कारण देत असताना कधी संजय राऊत तर कधी आदित्य ठाकरे यांनाही उठावासाठी कारणीभूत धरण्यात येत होते. आदित्य ठाकरे मंत्र्यांच्या कामात हस्तक्षेप करतात असेही सांगण्यात येत होते त्यामुळे हिंदुत्वाच्या मुद्द्यासोबत घराणेशाही हेसुद्धा एक कारण पुढे करण्यात येत होते. मात्र शिंदे गटात गेल्यानंतर घराणेशाही संपणार आहे का किंवा शिंदेगटात घराणेशाही नाही का या प्रश्नांचे उत्तर उठाव करणाऱ्या नेत्यांकडून मिळणार नाही. कारण अन्य राजकीय पक्षात जशी घराणेशाही आहे तशीच घराणेशाही शिंदे गटातल्या नेत्यांकडेही आहे. याची सुरुवातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापासूनच होते. आपल्या बुलडाणा जिल्ह्यापुरते बोलायचे झाल्यास आपल्या जिल्ह्यातील शिंदेगटातील नेतेही याला अपवाद नाहीत.

खासदार प्रतापराव जाधव

खासदार प्रतापराव जाधव यांना फार मोठा राजकीय वारसा नव्हता हे मान्य केले तरी ते अगदी काहीच नव्हता असे म्हणणे चुकीचे ठरेल. ते जरी स्वतःला जिल्ह्यातील शिवसेनेचे फाउंडर म्हणवून घेत असले तरी त्यांची सुरुवात मात्र काँग्रेसमधुन झाली. शरद पवारांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. त्यानंतरच्या काळात धर्मवीर दिलीपराव रहाटे यांच्यासोबत त्यांनी शिवसेनेत काम केले. धर्मवीरांच्या अकाली निधनानंतर त्यांनी निष्ठेने शिवसेना वाढवली ते आतापर्यंत. तीनदा आमदार, राज्यात मंत्रीपद आणि तीनदा खासदार एव्हढी महत्वाची पदे मिळाल्यानंतर आजघडीला त्यांच्या कुटुंबातील जवळपास प्रत्येकाकडे कुठले ना कुठले पद आहेच. भाऊ संजय जाधव हे नगराध्यक्ष राहून गेलेत, मुलगा ऋषी जाधव यांना गेल्यावेळी सहज जिल्हा परिषदेचे तिकीट देण्यात आले अर्थात त्यात त्यांचा पराभव झाला हा भाग वेगळा. मात्र त्यांना युवासेनेचे जिल्हाप्रमुख पद, आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात राष्ट्रीय पातळीवरील युवासेनेचे पद आणि आता पुन्हा खा. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वात तेच पद ऋषी जाधवांना मिळाले आहे. याशिवाय अन्य नातेवाईक, पुतणे यांच्यावर सुद्धा खा. जाधवांचा वरदहस्त राहिला आहे. अर्थात या सगळ्या मंडळींना पदे मिळण्याचा एकमेव निकष म्हणजे ते खासदार साहेबांच्या कुटुंबातील आहे एव्हढाच आहे.

आमदार संजय गायकवाड

या यादीत दुसरा क्रमांक लागतो तो बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांचा.आमदार संजय गायकवाड यांना कोणताही राजकीय वारसा नव्हता. स्वतःच्या कर्तृत्वावर त्यांनी त्यांचे स्थान निर्माण केले आहे. यांच्या पत्नी याआधी बुलडाणा नगरपरिषदेच्या अध्यक्षा होत्या. आता यापुढील निवडणुकीत आ.गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राहण्याची शक्यता आहे. कुणाल गायकवाड यांच्याकडे शिवसेनेचे कुठलेही संघटनात्मक पद नसले तरी त्यांचा व्यापक जनसंपर्क आहे ही बाजू नाकारता येणार नाही. याशिवाय आ. गायकवाड यांच्या राजकीय प्रवासात त्यांच्या कुटुंबाने त्यांना नेहमीच साथ दिली असल्याने गायकवाड परिवारातील अन्य सदस्य सुद्धा राजकारणात सक्रिय आहेत. त्यातील काही पडद्यावर आहेत तर काही पडद्यामागे..!

आमदार संजय रायमुलकर

मेहकरचे आमदार आणि खासदार जाधवांचे शिष्य आ. संजय रायमुलकर यांनी त्यांचे गुरू असलेल्या खासदारांकडून घराणेशाहीचा गुण घेतलाय. पुत्र नीरजला प्रमोट करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असतात.आपले गुरू त्यांच्या मुलासाठी करू शकतात तर आपण आपल्या मुलाचे राजकीय भविष्य का पाहू नये असे आ. रायमुलकरांना वाटत असेल तर त्यात काय चुकीचे आहे?