BULDANA LIVE SPECIAL:आघाडीने निवडणूका? ''मुश्किल ही नही नामुमकीन भी''! बुलडाणा जिल्ह्यातील आघाडीत बिघाडीच बिघाडी!! कार्यकर्त्यांना वाटतेय संधी न मिळण्याची भीती

 
tyghjk
 बुलडाणा (संजय मोहिते:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  सुपरहिट असलेला डॉन चित्रपटातील  अजूनही सुपरहिट असलेला डायलॉग म्हणजे ' डॉन को पकडना मुश्किल ही नही ,नामुमकीन भी है' हा होय! हा संवाद आठविण्याचे कारण म्हणजे महाविकास आघाडीचे ' प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी काल केलेले विधान असून त्यांनी पुढील सर्व निवडणुका आघाडी एकत्र लढविणार असल्याचा दावा केला आहे. मात्र बुलडाणा जिल्ह्याचे  राजकीय व आघाडीचे चित्र लक्षात घेतले तर या संवादाप्रमाणेच नामुमकीन असल्याचे मजेदार चित्र आणि राजकीय वास्तव देखील आहे. 


 सुप्रिम कोर्टाचा धक्का आणि आयोगाने सुरू केलेली स्थानिक स्वराज्य निवडणुकांची पूर्वतयारी या पार्श्वभूमीवर आघाडीची बुलंद तोफ राऊत यांचे हे विधान आले आहे. यामुळे त्याला महत्व प्राप्त झाले आहे. पण दूरवरच्या बुलडाणा जिल्ह्यात तरी या विधानाला आघाडीतील नेते गंभीरपणे घेतील असे तूर्तास तरी मुश्किल आहे. याचे कारण तेरा पैकी बहुतेक तालुक्यात आघाडीतील तिन्ही पक्षात अजिबात ताळमेळ नाही किंबहुना बिघाडीच आहे असे चित्र आहे.

पालकमंत्र्यांपासून सुरुवात करायची झाल्यास सिंदखेडराजा मतदारसंघात राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यातून विस्तव जात नाही हे उघड आहे. आजी माजी आमदार राजेंद्र शिंगणे व शशिकांत खेडेकर यांच्यातील बिघाडी कमी होणे तर दूर वाढतच चालली आहे. काँग्रेस पक्षाशी देखील दोघांचे सलोख्याचे संबध नाहीये.  देऊळगाव राजा तालुक्यात हीच स्थिती आहे. सर्वात कळस म्हणजे पालकमंत्री डॉ शिंगणे व खासदार प्रतापराव  जाधव यांच्यातील मागील लोकसभा संग्रामातील कटुता व विसंवाद कायम आहे. दोन मोठ्या नेत्यांत ही स्थिती तर इतरांचे काय? असा प्रश्न यामुळे उपस्थित होतो. 

ऑल इज नॉट वेल
मेहकर व लोणार मध्ये काँग्रेस व सेना एकत्र येणे तर महा- नामुमकीन आहे! या दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादी जेमतेम असल्याने व राष्ट्रवादी- सेना मधील वितुष्ट पाहता आघाडी द्वारे निवडणुका  'मुंगेरी लाल के हसीन सपने' च म्हणावे ! बुलडाणा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध काँग्रेस असा छुपा( खरं तर उघडच)  सामना हाय! राष्ट्रवादी या दोघांपासून सुरक्षित अंतर राखून  आहे. मोताळा नगरपंचायत च्या निवडणुकीत शेवटपर्यंत आघाडी न झाल्याने ही बिघाडी सिद्ध झाली. मलकापूर, नांदुरा, जळगाव, संग्रामपूर, खामगाव, शेगाव मध्ये शिवसेना जेमतेम असल्याने त्यांना काँग्रेस गंभीरतेने घ्यायला तयार नाही.

तिथे राष्ट्रवादी चे संघटन देखील नेत्यापुरते मर्यादित आहे. संग्रामपूर नगरपंचायतच्या लढतीत या तिघा मित्र(?)  पक्षांची आघाडी झाली खरी पण नवख्या प्रहार ने त्यांचा एकतर्फी धुव्वा उडविला होता! खामगाव पुरता विचार करायचा तर पालकमंत्री व दिलीपकुमार सानंदा यांच्यातील 'अंतर' कायम आहे. याशिवाय राष्ट्रवादी अन सेना कमकुवत असल्याने काँग्रेस त्यांना जादा ' जागा ' देऊ इच्छित नाही.

शेगाव मध्ये असेच चित्र आहे. चिखली मध्ये काँग्रेस या दोघांच्या तुलनेत स्ट्रॉंग असल्याने एकतर्फी जागा वाटपाची धास्तीवजा शक्यता आहे. तिथे काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे भाजपा सोबत लढत असताना दोन्ही मित्र पक्ष त्यांना साथ देत नाही . दुसरीकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष  नाना पटोले यांनी बुलडाणा सह ठिकठिकाणी केलेल्या वक्तव्यात काँग्रेस स्वबळावर(च)लढणार असे स्पष्ट केले आहे. 

ही आहे खरी भीती

 आगामी जिल्हा परिषद, पंचायत समित्या व नगरपरिषद निवडणुका आघाडी द्वारे लढायचेच म्हटल्यास , जागा वाटप आणि जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी तिन्ही पक्ष प्रयत्न करणार हे उघड आहे. मग संधी हुकलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी करायचे काय ? असा यक्ष प्रश्न उरतो. यामुळे नाराज कार्यकर्ते बंड पुकारणार, दुसऱ्या पक्षामध्ये जाणार( कमळ टपलेलेच आहे) , किंवा गेम दाखविणार हे उघड आहे.  याचा फटका नेत्यांना विधानसभेत बसणार हे निश्चित! यामुळे पक्ष संघटन कमकुवत होणार आहे. यामुळे खासदार राऊत यांनी कितीही दावा केला तरी आघाडी होणे मुश्किल ही नही.....