BULDANA LIVE SPECIAL जिल्ह्याच्या राजकारणावर 'राज' करणारा इंद्र अन सिंदखेडचा 'राजा"! प्रेरणादायी गोष्ट निष्ठावान नेत्याची..!!
राजकीय क्षेत्रातील अशी अनेक वैशिष्ट्ये जोपासणाऱ्या या नेत्याचे नाव आहे राजेंद्र भास्करराव शिंगणे! आजच्या राजकारणाने कारस्थान आणि विश्वासघाताचे एव्हरेस्ट गाठले असताना या नेत्याने ही राजकीय किमया साधली आहे. यामुळे शारीरिक उंची कमी असली तरी ' मूर्ती लहान पण कामगिरी महान' मुळे जिल्ह्याच्या राजकारणात त्यांच्या इतकी उंची कुणीच गाठू शकले नाहीये! नजीकच्या काळात त्यांना कुणी गाठू शकेल, त्यांची बरोबरी करेल असा नेता जिल्ह्याच्या राजकारणात वावरताना दिसत नाही (आणि भविष्यात निर्माण होईल अशी शक्यताही वाटत नाही)...
गल्ली ते ' दिल्ली! '
इतक्या उंचीच्या या नेत्याची राजकीय वाटचाल अगदी रोमांचक, नाट्यमय आणि अविश्वसनीय वाटावी अशीच आहे. बुलडाणा जिल्ह्यातील राजकारण परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करीत असताना आणि महाराष्ट्र राजकीय संक्रमणातुन जात असताना नव्वदीच्या दशकात, आटपाट बुलडाणा नगरीत बीएएमएस ची पदवी घेऊन आलेल्या डॉ. राजेंद्र शिंगणे नामक एका युवकाने तत्कालीन सूर्यवंशी पेट्रोल पंपासमोरील देशपांडे ड्राइविंग स्कुल जवळ आपलं छोटेखानी क्लिनिक थाटले. पिताश्री भास्करराव शिंगणे हे जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील राजे अन राजकारणातील मोठे प्रस्थ. पण हा गडी दवाखाना आणि मित्र परिवारात जास्त रमायचा.
मात्र रक्तात राजकारण भिनलेला हा युवक राजकारणापासून अलिप्त राहणे शक्यच नव्हते. यामुळे युवक काँग्रेसच्या माध्यमाने त्याने राजकीय व सार्वजनिक जीवनात पदार्पण केले. ते आजच्या सारखे पोलिटिकल लॉंचिंग नव्हतें, आयुष्यभर साधेपणा जोपासणाऱ्या या युवा नेत्याचा राजकीय श्रीगणेशा देखील साधेपणाने झाला. सन १९९० च्या विधानसभा निवडणुकीत भास्करराव शिंगणेना काँग्रेसने उमेदवारी दिली. विजय, आमदारकी आणि मंत्री पद असे तेंव्हाचे चित्र होते . पण पक्षांतर्गत गटबाजी आणि जनता दलाने घेतलेली १६ हजार मते यामुळे १७६६ इतक्या निसटत्या फरकाने त्यांचा पराभव झाला. पुढे बंडखोरीचा इतिहास घडविणारे राजेंद्र गोडे( शिवसेना) हे आमदार झाले. यामुळे आणि त्यांच्या जाहीर सत्कारात झालेला अवमान असह्य झाल्याने ' राजकारणातील भास्कर' अकाली मावळला!
हादसेने जिंदगी बदल दी...
या घडामोडी राजेंद्र शिंगणे यांच्या जीवनावर दूरगामी परिणाम करणाऱ्या आणि त्यांचे जीवनच बदलून टाकणाऱ्या ठरल्या. वाईटातून चांगलं होतं असे म्हणतात अन ते खरे ठरून जिल्ह्याला, राज्याला एक चांगला नेता मिळाला तो असा. १९९५ मध्ये सिंदखेडराजा मतदारसंघातून अपक्ष लढण्याच्या राजेंद्र शिंगणे यांच्या धाडसाला पब्लिकचे पाठबळ मिळाले आणि तिशीच्या उंबरठ्यावर असलेला हा युवा नेता आमदार झाला. सहकार क्षेत्रावर त्यांची घट्ट पकड राहिली.
पुढे ( आमदार) या शब्दाने त्यांचा कायम पिच्छा पुरविला तो थेट २०१९ पर्यंत! मध्यंतरी एका लढतीत ते अलिप्त राहिले, अन्यथा सलग ६ वेळा आमदार राहण्याचा विक्रम त्यांच्या नावावर राहिला असता. आमदार पाठोपाठ अलीकडे नामदार, पालक मंत्री या शब्दानीही त्यांचा सतत पाठलाग केला! आघाडीचे सरकार आले की त्यांचा लालदिवा फिक्स असे समीकरणच जुळले जणू! टीकाकार त्यांना काहीही म्हणो पण स्वयंभू नेत्याने सर्व काही स्वबळावर कमावलं, निर्माण केलं, जोपासले हे वास्तव आहे. यामुळे हा राजा माणूस बावनकशी सोनं असून कायम चकाकणारच आहे...
मायाळू पालकमंत्री
पालकमंत्री या शब्दाचा खरा अर्थ साहेबांच्या रूपाने जिल्हावासियांना कळला. बुलडाणा जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघातील विकासकामांसाठी साहेब मंत्रिमंडळ बैठकीत पाठपुरावा करत होते. त्यामुळे जिल्ह्यातील विरोधी पक्षात असलेल्या आमदारांना सुद्धा साहेब आपले नेते वाटतात हे विशेष. बोटावर मोजण्याइतक्या राजकीय नेत्यांचा द्वेषरुपी विरोध हा अपवाद वगळता साहेब म्हणजे अजातशत्रू व्यक्तिमत्व ! त्यामुळे विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना सुद्धा साहेब आपले काम नक्की करतील असा विश्वास वाटतो. विकासकामांत कधीही राजकारण आडवे येणार नाही याची काळजी साहेब नेहमी घेतात. प्रत्येकाच्या सुखदुःखात साहेब सहभागी होतात. त्यामुळे मायाळू पालकमंत्री कसा असतो हे साहेबांच्या काळात जिल्ह्याने अनुभवले हे नक्की.