BULDANA LIVE SPECIAL: मोहीम ऐच्छिक तरीही कडवे आव्हानच! 20 लाखांवर मतदान कार्डाशी जोडावे लागणार आधार!

 
aadhar
 बुलडाणा ( संजय मोहिते :बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चालू ऑगस्ट महिन्यात शुभारंभ होणाऱ्या मतदान कार्ड- आधार लिंक करण्याची मोहीम निवडणूक यंत्रणांची कठोर परीक्षा घेणारी ठरणार आहे. याचे कारण म्हणजे जिल्ह्यातील तब्बल 20 लाखांवर मतदारांना आधार कार्डसोबत जोडण्याची कामगिरी अपुऱ्या संख्येतील कर्मचाऱ्यांना करावी लागणार आहे. 

भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मुंबई स्थित मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या मार्गदर्शनात ही मोहीम राबविण्यात येईल. मतदारांची ओळख प्रस्थापित करणे, याद्यामधील नोंदीचे प्रमाणीकरण, एकाच व्यक्तीचे 2 मतदारसंघात किंवा एकाच व्यक्तीचे एका मतदारसंघात दोनदा नोंदणी रद्द करणे किंबहुना व्यावहारिक भाषेत सांगायचे झाल्यास बोगस मतदारांची नावे वगळणे हा यामागील उद्धेश आहे.
 
 या मोहिमेसाठी एसडीओ यांना प्राधिकृत करण्यात आले असून ऑफ व ऑन लाईन या दोन्ही पध्दतीने मतदारांना आपला आधार क्रमांक कळविता येणार आहे. मतदाराना 6-ब हा अर्ज भरून किंवा सुविधा पोर्टल, ऐपच्या माध्यमाने हे करता येईल. तसेच बीएलओ घरोघरी जाऊन आधार क्रमांक संकलित करतील.   बूथ निहाय पहिले विशेष शिबीर 4 सप्टेंबरला  व नंतर वेळोवेळी शिबिरे आयोजित करण्यात येणार आहे.
 
सिंदखेडराजात सर्वाधिक मतदार..

 दरम्यान या मोहिमेचे वैशिट्य म्हणजे ती पूर्णपणे ऐच्छिक असून  आधार क्रमांक देणे मतदारांच्या मनावर आहे. आधार क्रमांक दिला नाही तरी कोणत्याही मतदाराचे नाव यादीतून वगळण्यात येणार नसल्याचे  आयोगाने स्पष्ट केले आहे. मात्र मोहीम ऐच्छिक असली तरी चांगला उद्धेश पाहता बहुतेक मतदार लिकिंग साठी ' येस'  म्हणणार हे उघड आहे. मागील 5 जानेवारी 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीनुसार 7 विधानसभा मतदारसंघात  तब्बल 20 लाख, 42 हजार 119 मतदार  आहेत.

 यामध्ये 10 लाख 72 हजार 871  पुरुष तर 9 लाख 69 हजार 238 महिलांचा समावेश आहे. सिंदखेडराजा मध्ये सर्वाधिक म्हणजे 3 लाख 10 हजार 844 मतदार आहेत. जळगाव विधानसभा मतदारसंघात 2 लाख 95 हजार 837, बुलडाणा 2 लाख 94 हजार 464, मेहकरात 2 लाख 92 हजार 881 चिखली मध्ये 2 लाख 92 हजार 680, खामगावात 2 लाख 83 हजार 341 तर मलकापुरात 2 लाख 73 हजार 72 मतदार आहेत. याशिवाय 10 तृतीय पंथीचा समावेश आहे..!