BULDANA LIVE SPECIAL तर आदित्य ठाकरेंची बुलडाण्यातील सभा रद्द करण्याची नामुष्की ओढवली नसती! आयोजकांनी माघार घेऊन साधले तरी काय? आयोजकांचा अट्टाहास म्हणजे "खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी"

 
बुलडाणा:(BULDANA LIVE SPECIAL): युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या गांधीभवन प्रांगणातील सभास्थळाला पोलीसांनी कायदा व सुव्यवस्थेच्या कारणावरून परवानगी नाकारल्यानंतर, याच ठिकाणी आम्ही सभा घेणार असे ठणकावून सांगणाऱ्या ठाकरे गटाच्या शिवसेनेने अचानक बुलडाण्यातील सभाच रद्द केल्याने  राजकीय क्षेत्रात आश्चर्य  वाटून चर्चेला विषय मिळाला आहे. या सभेसाठी शहरातील  अन्य ठिकाणे शोधण्याचा पर्याय उपलब्ध असतांनाही आयोजकांनी माघार घेऊन काय साधले आहे? सभेसाठी आम्ही निवडले तेच ठिकाण हवे अन्यथा सभा घेणार नाही हा आयोजकांचा अट्टाहास म्हणजे 'खाईल तर तुपाशी नाही तर उपाशी'अशातलाच प्रकार! 

   thakre

         [   जाहिरात 👆]

पोलीसांनी आयोजकांना गांधी भवन ह्या सभास्थळाला परवानगी नाकारत असल्याचे कारणांसह कळवले होते.मात्र पोलीसांनी सभेला  परवानगी नाकारल्याच्या बातम्या पसरवल्या गेल्या.विरोधी शिंदे गटाने आदित्य ठाकरेंच्या सभेचा धसका घेतल्यानेच दबावाखाली पोलीसांनी सभेला परवानगी नाकारली असाही सूर आळवला गेला.सभा होऊ देण्यात अडथळे आणले जात आहेत असे चित्र सोशल मिडिया वर रंगू लागले.यामुळे आपसूकच लोकांची सहानूभुती मिळणे संभवत होते.सभेला परवानगी नाकारली हे 'अर्धसत्य' तर सभास्थळाला परवानगी नाकारली हे 'पूर्णसत्य' ठाऊक असतांनाही ठाकरे गटाच्या शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर यांचा  एक व्हिडिओ सोशल मिडिया वर  फिरला.त्यात खेडेकर यांनी  पोलीसांच्या भुमिकेवर हरकत घेत आदित्य ठाकरेंची सभा आम्ही त्याच नियोजित ठिकाणी घेणार.असा ठाम निर्धार व्यक्त केल्याने सभास्थानाच्या मुद्द्यावर आयोजक व पोलीसांत वाद होतो की काय?असे वाटू लागले होते.पोलीसांनी सभेच्या आयोजकांना दिलेल्या पत्रात, ठाकरे गट व शिंदे गटात ३ सप्टेंबर रोजी झालेल्या बहूचर्चित वादाचा उल्लेख करत पुन्हा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वर्तवली होती व शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचे जनसंपर्क कार्यालय परिसरातच असल्याने नियोजित सभास्थळाला परवानगी नाकारत असल्याचा स्पष्ट उल्लेख केला होता.त्यावर  ठाकरे गटाचे जिल्हा  संपर्कप्रमुख खेडेकर यांनी, ३ सप्टेंबरला राडा करणाऱ्या शिंदे गटाला या सभेच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंध करण्याऐवजी ठाकरे गटाच्या आयोजकांनाच सभास्थळाची परवानगी नाकारल्याचे सांगणे म्हणजे 'चोर सोडून संन्याशाला फाशी'असा प्रकार असल्याची टिका केली होती.पण खेडेकर यांचा कणखर पवित्रा सायंकाळ पर्यंतच टिकला.

  शिवसेना  पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या चिखली येथील २६ नोव्हेंबरच्या जाहिर सभेच्या नियोजनासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे शनिवारी दुपारी चिखली येथे आले असतांनाच आदित्य ठाकरेंच्या बुलडाण्यातील सभास्थळाचा विषय अधिक जोरकसपणे हाताळला जाणे अपेक्षित होते.मात्र तसे काही झाले नाही.उलट आदित्य ठाकरे यांची बुलडाण्यातील सभाच रद्द करून  आयोजकांनी माघार घेतल्याची    बातमी आली.आता निष्ठा यात्रेची मेहकर येथील सभा आटोपून आदित्य ठाकरे हे बुलडाण्याकडे येतील मात्र मढ फाट्यावर शेतक-यांशी संवाद साधून पुढे सिल्लोडकडे रवाना होतील.

 बुलडाण्यासारखाच आदित्य ठाकरे  यांच्या सभास्थळाचा वाद सिल्लोड येथेही उद्भवला होता.नियोजित सभास्थळाला पोलीसांनी परवानगी नाकारल्यानंतर सभेसाठी पर्यायी जागा शोधून तेथील आयोजकांनी समंजसपणा दाखवला.हे उदाहरण समोर असतांना बुलडाण्यातील आयोजकांनी आदित्य ठाकरे यांची सभा रद्द करून काय साधले आहे? याबाबत राजकीय वर्तुळात विविध अर्थ काढले जात आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची (सत्तांतरानंतरची) पहिली जाहीर सभा चिखली येथे २६ तारखेला होत आहे.या पृष्ठभूमीवर उद्या  ७नोव्हेंबरला बुलडाणा व मेहकर येथील आदित्य ठाकरेंच्या सभा ह्या‌ वातावरण निर्मितीसाठी पूरक समजल्या जात असतांना बुलडाण्यातील सभेबाबत अवसानघात का झाला?हे एक कोडेच आहे.

बुलडाण्यातील सभा रद्द झाल्याने पोलीस प्रशासनाचा बंदोबस्ताचा ताण टळला.त्याचबरोबर  बुलडाणा मतदार संघातील  ठाकरे गटाची कमजोरी ही समोर आली.ही सभाच होऊ नये असे वाटणारा विरोधी गट आतून नक्कीच खुष झाला असणार!तात्पर्य आदित्य ठाकरे यांची सभा रद्द करण्याचा निर्णय हा अविचाराचा,दूरदृष्टीच्या अभावाचा आणि राजकीयदृष्टया ठाकरे गटाची पिछेहाट दाखवणारा दिसत  आहे. केवळ सभास्थळाच्या मुद्यावर सभाच रद्द करण्यावरून बुलडाणा  विधानसभा क्षेत्रात ठाकरेंच्या शिवसेनेकडे  दमदार नेतृत्वाचा अभाव असल्याचे द्योतक आहे. आक्रमक व पावरफुल स्थानिक शिंदे गटाला टक्कर देऊ शकेल असा कुणी धाडसी चेहरा ठाकरे गटाकडे असता तर सभा रद्द करण्याची नामुष्की टळली असती! असे राजकीय वर्तुळात  खुलेआम बोलले जात आहे.