BULDANA LIVE SPECIAL! 'थेट अध्यक्ष' चा निर्णय भाजपा- शिंदे गटाच्या पथ्यावर! मागील लढतीत जिल्ह्यात भाजपालाच सर्वाधिक फायदा! कसा ते वाचा..!

 
kamal
बुलडाणा ( संजय मोहिते:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): पालिका अध्यक्षच नव्हे सरपंचाची देखील जनतेतून निवड करण्याच्या निर्णयाकडे कटाक्ष असलेल्या भाजपाने' पुन्हा येईल, पुन्हा येईल म्हणत  सत्तेत 'पुन्हा आल्यावर'  लगेच महाआघाडी सरकारचा निर्णय फिरवीत पालिका अध्यक्ष व सरपंचाची थेट जनतेतून निवड करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. बुलडाणा जिल्ह्याची राजकीय स्थिती लक्षात घेतली तर हा निर्णय भाजपा- शिंदे गटाला अनुकूल ठरण्याची दाट शक्यता असल्याचे राजकीय जाणकारांचा अंदाज आहे.

सत्तांतराला पंधरवाडा उलटला असला तरी मुख्यमंत्री अन उप मुख्यमंत्री ही दोनच पदे असलेल्या ' ईडी' ( एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस) सरकारने आपल्या दुसऱ्याच मंत्रिमंडळ(?) बैठकीत नगराध्यक्ष व सरपंच निवड जनतेतून करण्याचा निर्णय घेतला. यामागे भाजपचे निवडणुकीय तंत्र आहे.  शहरी भागातील मतांचे ध्रुवीकरण, शहरांची  सामाजिक रचना( मतदारसंख्या) , सर्व समाजघटकामध्ये असलेला जनाधार आदी घटक लक्षात घेऊन फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना  वापरलेला 'थेट' फॉर्म्युला लाभदायक ठरला. 

मागील लढतीत झाला थेट लाभ

बुलडाणा जिह्यापुरते सांगायचे झाल्यास 9 पैकी 5 पालिकेत भाजपाने' थेट'  बाजी मारली. ( लोणार व सिंदखेडराजा पालिकांची मुदत वेगळी आहे. म्हणून 11 पैकी 9 पालिकांचीच निवड झाली होती, हे येथे उल्लेखनीय) चिखली मध्ये प्रिया बोन्द्रे, देऊळगाव राजात सुनीता शिंदे, खामगाव मध्ये अनिता डवरे, जळगाव मध्ये सीमा डोबे तर शेगावात  शकुंतला बुच यांच्या रूपाने भाजपने बाजी मारली होती . काँग्रेसला मलकापूर व मेहकर मध्ये यश मिळाले तर बुलडाण्यात चौघांच्या भांडणात पाचव्याचा लाभ या नवीन म्हणीप्रमाणे   भारिप बमसंच्या नजमुन्नीसा बेगम मो. सज्जाद यांची लॉटरी लागली. नांदूरयात शहर विकास आघाडीच्या रजनी जवरे या विजयी झाल्या. 

 भाजपच्या या बळाला आता सेनेच्या बंडखोर गटाच्या ताकदीची भर पडली आहे. 2 आजी, एक माजी आमदार अगोदरच शिंदेशाही मध्ये असून खासदार सध्या सुरक्षित अंतर ठेवून आहे. मात्र ते देखील 'हे बंड नव्हे उठाव' या मताचे असल्याची चर्चा आहे. यामुळे आरक्षण फेर रचनेसह होणाऱ्या लढतीत 'ईडी' म्हणजेच एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचे वर्चस्व राहण्याची दाट चिन्हे आतापासूनच दिसून येत आहे.