BULDANA LIVE SPECIAL! नुसतीच आशा...अपेक्षा... चर्चाच की संधी?! वासनिकांच्या पदरात पडेल का खासदारकी..!

 
बुलडाणा( संजय मोहिते: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  कोणत्याही मोठ्या  संघटनात्मक घडामोडीत  वा निवडणुकीपूर्वी' 'त्यांच्या' नावाची चर्चा होते, निष्ठावान कार्यकर्त्यांत आशा निर्माण होते ,  अपेक्षा व्यक्त होते,  ही चर्चा अंतिम टप्प्यापर्यंत रंगते पण शेवटी कार्यकर्त्यांची निराशा होते...

भाजपच्या वर्चस्वाने  देशाचे राजकारण व्यापले असताना व अनेक दिग्गज काँग्रेसी नेते 'हातात कमळ' घेत असताना त्यांची पक्षावरील निष्ठा कायम आहे.  जवळपास ८ वर्षांपासून  खासदारकी नाही, राष्ट्रीय काँग्रेसमध्ये दररोज किमान १४ तास राबणारा त्यांच्यासारखा पदाधिकारी नाही, सध्या जी-२३( काँग्रेस अंतर्गत असंतुष्ट गटा) पासून आता ते २३ हात दूर आहेत. त्यामुळेच राजस्थान मध्ये नुकतेच पार पडलेल्या चिंतन( संकल्प) शिबिरानंतर काँग्रेसने जाहीर केलेल्या निर्णायक अश्या टास्क फोर्स मध्ये त्यांचा समावेश करण्यात आलाय!  पण अश्या बौद्धिक, तात्पुरत्या समित्या,  फार तर राष्ट्रीय कार्यकारिणीत पद यापलीकडे त्यांच्या पंज्यात काही पडत नाही. या वृत्तातील व्यक्ति आहे ते  मुकुल वासनिक !


त्यांच्यासारखा अनुभवी, अभ्यासू, नेतृत्व अन कर्तृत्व असलेला नेता सभागृहात असणे आवश्यक आहे. त्यातही राज्यसभा त्यांच्या कार्यशैलीला मानवणारी आहे. मात्र आठेक वर्षांपासून खासदारकी पासून वंचित या नेत्यांची आठवण, चर्चा होण्याचे कारण म्हणजे येत्या १० जूनला होऊ घातलेली राज्यसभेची द्विवार्षिक निवडणूक होय! राज्यसभेवर महाराष्ट्रातुन निवडून द्यावयाच्या एका जागेच्या उमेदवारीच्या शर्यतीत ते ( नेहमीप्रमाणे) आघाडीवर आहेत.

मागील दोनेक आठवड्यापासून जिल्ह्यातील हजारो निष्ठावान कार्यकर्त्यांसह दिल्लीच्या राजकीय वर्तुळात त्यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. यातील मोठी अडचण असणारे पी. चिदंबरम हे तामिळनाडू मधून राज्यसभेवर जाणार हे जवळपास नक्की आहे. त्यामुळे वासनिक समर्थकांचे हौसले बुलंद आहे.  या जागेसाठी अर्थात इच्छुकांची संख्या मोठी आहे. मात्र मागील दोनेक दिवसांत मुकुल वासनिक, मिलिंद देवरा आणि अविनाश पांडे या चेकलिस्ट ची जोरदार चर्चा आहे. कार्यक्षमता, अनुभव, कर्तृत्व, पक्षकार्य, निष्ठा , गांधी घराण्याशी जवळीक या कोणत्याही कसोटीवर पाहिले तर वासनिक (कितीतरी) सरस आहे.

त्यामुळे पुन्हा एकदा आशा, अपेक्षा, चर्चा हे राजकीय चक्र सुरू झाले आहे. पण ही नेहमीप्रमाणे  नुसतीच चर्चा की संधी मिळेल असा यक्ष प्रश्न यानिमित्त उपस्थित झाला आहे. काँग्रेसचा आलेख सतत घसरत असला तरी कॉग्रेसचे ' हवेतील राजकारण'अजूनही   कायम आहे. शेवटच्या मिनिटात काय होईल याची खात्री नसते. ३१  मे  अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे.  प्राप्त माहितीनुसार २७ मे रोजी काँग्रेसची यादी घोषित होण्याची दाट शक्यता आहे. यात वासनिकांचे नाव असेल काय याची लाखो कार्यकर्त्यातील व काँग्रेस वर्तुळातील उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. मान्सून च्या आगमना प्रमाणेच जिल्ह्यात या गुड न्यूज ची आतुर प्रतीक्षा आहे. असे झाले तर संपूर्ण देशात सर्वाधिक फटाके बुलडाणा जिल्ह्यात फुटणार आणि  जिल्ह्याचे आकाश गुलालाने माखणार हे नक्की...!