BULDANA LIVE EXCLUSIVE: 'संकटाच्या काळात तुम्हाला एकटं पडू देणार नाही' ; जाहिरातींनी धक्के आणि संभ्रमही! संजुभाऊंचा खासदारांना घरचा अहेर अन उद्धव ठाकरेंना शुभेच्छा !!

 बळीराम मापारींसह घाटाखालील पदाधिकारी  ठाम..!

 
बुलडाणा (संजय मोहिते: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): कोणत्याही पक्षाच्या नेत्याचा वाढदिवस म्हणजे वृत्तपत्रासह फ्लेक्स बोर्ड द्वारे शुभेच्छाचा भडिमार ही आता  सामान्य बाब ठरली. पण महाबंडखोरी मुळे घायाळ अन पायउतार झालेले शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा यंदाचा वाढदिवस त्यांच्यावरील सर्वात भीषण संकटाच्या मुहूर्तावर आलाय! यामुळे त्यांना आज देण्यात आलेल्या वृत्तपत्रीय शुभेच्छा राजकीय संभ्रम निर्माण करणाऱ्या तर काही आश्चर्याचा महा धक्का देणाऱ्या ठरल्या. यामुळे एरवी केवळ जाहिरातदारच वाचतात त्या जाहिराती खमंग चर्चाच नव्हे मजेदार राजकीय संभ्रम आणि राजकीय वादळ निर्माण करणाऱ्या ठरल्याचे मजेदार चित्र हाय...

 आजी मुख्यमंत्र्यांनी माजी मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या ही बाब  चॅनेल्स वर आज किमान सकाळी तरी हॉट न्यूज ठरली. त्यांनी केवळ माजी सीएम असा उल्लेख केला. यावर वरताण करीत प्रमुख 'उठावकर्त्यानी' त्यांना शिवसेना प्रमुख असे संबोधन करून शुभेच्छा देणारी पोस्ट टाकली! पक्ष आणि पक्षचिन्ह कुणाचे यावरून कायदेशीर युद्ध पेटले असताना या शुभेच्छा संभ्रम आणि वादळ हे दोन्ही निर्माण करणारे ठरण्याची चिन्हे आहेत. जिल्हा मुख्यालयातील 
पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या जाहिरातीची  थीम, या बातमीचे हेडिंग हाय! त्यात जिल्हा प्रमुख बुधवत , माजी नगरसेवक हेमंत खेडेकर यांचे फोटु अपेक्षित असले तरी काही फोटुनी वादळी प्रश्न उभे केले आहे. 
 
संजुभाऊ मित्र मंडळाच्या उद्धवसाहेबांना शुभेच्छा.....?

 अश्याच 2 संभाव्य वादळी जाहिरात 'प्रतापगड' मधून आल्या असून त्या सेनेच्या दोन्ही गटांनाच नव्हे जिल्ह्याच्या राजकारणात वादळ निर्माण करणाऱ्या आहे. शिंदे गटाचे सर्वेसर्वा खा. प्रतापराव जाधव यांचे बंधू अन मेहकरचे माजी अध्यक्ष संजय जाधव यांनी पक्षप्रमुखाना शुभेच्छा दिल्याने ही जाहिरात एक राजकीय बॉम्ब अन घरचा आहेर दोन्ही ठरावे! लोणारसह मेहकर मतदारसंघात जबरदस्त प्रभाव असणारे जिल्हा प्रमुख बळीराम मापारी यांनीही शुभेच्छा जाहिरात देऊन आपण 'मातोश्री' सोबतच असल्याचे नमूद करीत आपली दिशाच स्पष्ट केली! शिंदे गोटात सामील झाल्यावर 23 ला मेहकरात पार पडलेल्या  बैठकीत हे दोघे विर गैरहजर होते, हे विशेष! घाटाखालील पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या जाहिराती लक्षात घेतल्या तर मलकापूर ते संग्रामपूर पर्यंत सेनेची फारशी पडझड झाली नसल्याचे स्पष्ट आणि सिद्ध होते...