BULDANA LIVE EXCLUSIVE "भाऊ" असं कुठ असत व्हय? काँग्रेस सदस्य नोंदणी अभियानात बोगसगिरी!! कॉलेजच्या मास्तरांना लावले कामाला, विद्यार्थ्यांनाच बनवले पक्षाचे सदस्य!

 
panja
चिखली( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):   अखिल भारतीय स्तरावरून काँग्रेसच्या सदस्य नोंदणीचा कार्यक्रम  गेल्या महिन्यात पार पडला. जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात जिल्हाभर सदस्य नोंदणी अभियान पार पडले. मात्र भाजपच्या सदस्य नोंदणी अभियानावर बोट ठेवणाऱ्या काँग्रेसनेही सदस्य नोंदणी अभियानात "बोगसगिरी" केल्याचे समोर आले आहे. माजी आमदार राहुल बोंद्रे अध्यक्ष असलेल्या अनुराधा इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांना कोणतीही कल्पना न देता  त्यांच्या मोबाईल नंबरचा उपयोग करून त्यानांच काँग्रेसचे सदस्य केल्याचा खळबळजनक अन् तितकाच गंभीर प्रकार बुलडाणा लाइव्हच्या तपासणीत समोर आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात नोंदणी झालेल्या सदस्यांपैकी किती सदस्य बोगस असा प्रश्न उपस्थित होत आहे.

बुलडाणा लाइव्हला मिळालेल्या विश्वसनीय माहितीनुसार जिल्ह्यात ७० हजारांच्या जवळपास काँग्रेसची सदस्य नोंदणी करण्यात आली. दिनांक ६ एप्रिल पर्यंत जिल्ह्यात ६२ हजार १५० जणांची सदस्य नोंदणी काँग्रेसने केली होती. त्यापैकी खामगाव १७ हजार ४६७, मेहकर १४ हजार ६६४, चिखली १० हजार २०८, मलकापूर ६ हजार ४३१, जळगाव जामोद ६ हजार २६, बुलडाणा ४ हजार ५९५ आणि सिंदखेडराजा २ हजार ७५९ अशी सदस्य नोंदणी झाली होती. काँग्रेस जिल्हाध्यक्षांचा बालेकिल्ला असणारा चिखली मतदारसंघ सदस्य नोंदणीत तिसऱ्या क्रमांकावर होता. त्या तुलनेत खामगाव आणि मेहकरने सदस्य नोंदणीत बाजी मारल्याचे दिसून आले. अर्थात या यादीत किती सदस्य खरे आणि किती खोटे हे मात्र अस्पष्ट आहे.

     अशी झाली बोगस नोंदणी

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने ही सदस्य नोंदणी ऑनलाईन पद्धतीने करण्यात येत होती.ज्याला काँग्रेसचे सदस्य व्हायचे त्याच्याकडे मतदान कार्ड असणे आवश्यक होते. मतदान ओळखपत्रावरील क्रमांक, आणि मोबाईल नंबर टाकल्यावर व्हेरिफिकेशन करण्यासाठी मोबाईलवर आलेला ओटीपी नोंदणी करणाऱ्याला सांगावा लागत होता. याशिवाय सभासदाचे नाव आणि फोटो सुद्धा अपलोड करावा लागत होता. मात्र मतदान ओळखपत्र एकाचे आणि मोबाईल व फोटो  दुसऱ्याचा अशी शक्कल लढवून ही बोगस नोंदणी करण्यात आली.

यासाठी मतदार याद्यांचा उपयोग करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. ज्याच्याकडे मतदान ओळखपत्र नाही अशाही व्यक्तीची काँग्रेस सदस्य नोंदणी झाल्याचे बुलडाणा लाइव्ह च्या पाहणीत समोर आले. विशेष म्हणजे ३१ मार्च २०२१ रोजी अनुराधा इंजिनिअरिंग कॉलेजच्या शिक्षकांनी काही विद्यार्थ्यांना हाताशी धरून हा "बोगस प्रोग्राम" राबवला. यात काही विद्यार्थिनींना सुद्धा काँग्रेसचे सदस्य बनविण्यात आले.

आपण काँग्रेसचे सदस्य होत आहोत याची पुसटशी कल्पना सुद्धा आधी विद्यार्थ्यांना नव्हती. तुम्हाला फक्त ओटीपी सांगायचाय यात तुमचे नुकसान नाही अन् फायदाही नाही असे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. त्यांचे फोटोही अपलोड करण्यात आले..पुन्हा विचारल्यावर त्यांना काँग्रेसचे सदस्य झाल्याचे सांगण्यात आले.  काँग्रेसची ही बोगस सदस्य नोंदणी समोर आल्याने हा सगळा खटाटोप जिल्ह्याच्या काँग्रेस  नेतृत्वाने कशासाठी केला असा प्रश्न तर पडणारच ना "भाऊ"...